नागपूर : नागपूर हिंगणा रोडपासून ५०० फूट आत, अमरनगर रोडवरून ८० फूट आत मातोश्रीनगर, वानाडोंगरी येथे प्रा. अंतराम जिभकाटे यांनी २७ वर्षापूर्वी भूखंड घेतला आणि २० वर्षापूर्वी त्यांनी तेथे घर बांधले. मात्र, येथपर्यंत येणाऱ्या रस्त्यावर पूर्वीच्या ग्रामपंचायतीने व आत्ताच्या नगर पंचायतीने चिमूटभर माती किंवा मुरुम टाकलेला नाही. साडेतीन फूट खोल व सहा घरांच्या मधोमध असलेल्या या रस्त्यावर त्यांनी खोदलेल्या विहिरीची माती व मुरुम स्वखर्चाने तेथे टाकला व तो रस्ता म्हणावा असा झाला आहे. मात्र, पावसाळ्यात चिखलाचा त्रास होतो, तो कायम आहे. याबाबत अनेकदा त्यांनी ग्राम-नगर पंचायतकडे अर्ज केल्या, विनंत्या केल्या. मात्र, २७ वर्षापासून त्यांचे दुर्लक्षच आहे. विशेष म्हणजे, घराजवळ आठ महिन्यांपूर्वी विद्युत खांब उभे करण्यात आले. मात्र, विद्युत तार अजूनही लागलेली नाही. घेतलेल्या विद्युत मीटरवरील आवरण दुरुस्त करण्यासाठी १३ महिन्यापूर्वी तक्रार केली. मात्र, त्याची दखलही घेतली नाही. त्यामुळे, निवडणुकात मतदान करण्याचा अधिकार केवळ उमेदवारांना निवडून देण्यासाठीच आहे का. त्या उमेदवारांनी मतदारांच्या अधिकाराचा जराही विचार करू नये का. असे सवाल जिभकाटे यांनी उपस्थित केले आहेत. असेच जर असेल तर मतदानाचा अधिकार तरी कशाला. त्यास्तव आमच्या कुटुंबाचे नाव मतदार यादीतूनच काढून टाका, असे पत्र प्रा. अंताराम जिभकाटे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले आहे.
...................