लाेकमत न्यूज नेटवर्क
कळमेश्वर : तालुक्यातील गोंडखैरी येथील मार्गालगत टाकलेले मातीचे ढिगारे अपघाताला आमंत्रण देणारे ठरत आहेत. परंतु याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष हाेत आहे. या मातीच्या ढिगाऱ्यांमुळे अपघाताची शक्यता बळावली असून, या समस्येची दखल घेऊन तातडीने ही माती सखल भागात टाकण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
नागपूर-अमरावती महामार्गावर असलेल्या गाेंडखैरी येथे गावात जाण्यासाठी तयार करण्यात आलेल्या मार्गालगत गेल्या अनेक महिन्यांपासून संबंधित कंत्राटदाराने मातीचे ढिगारे आणून टाकले आहेत. या ढिगाऱ्यांच्या मागील बाजूस खोलगट भाग आहे. या खोलगट भागात ही माती टाकणे आवश्यक होते. परंतु संबंधित कंत्राटदाराने याकडे दुर्लक्ष केले आहे.
या मार्गाने गोंडखैरी येथील नागरिक आपल्या वाहनाने ये-जा करतात. अशावेळी रात्री-अपरात्री कंपन्यांतून घरी येणाऱ्या नागरिकाचे वाहन नजर चुकीने ढिगाऱ्यावर गेल्यास जीवितहानी हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हे ढिगारे तात्काळ खोलगट भागात टाकावे, अशी मागणी सरपंच चांगदेव कुबडे, उपसरपंच मोहन झोडापे, माजी उपसरपंच हेमराज पोहनकर, रजनीकांत अतकरी आदींनी केली आहे.