-इकीगाईची मूळ कल्पना काय आहे?
निरोगी आणि पौष्टिक अन्नाव्यतिरिक्त, निसर्गाच्या कुशीत साधे आणि खुले जीवन जगणे, ‘ग्रीन टी’ आणि उप-उष्णकटिबंधीय हवामान म्हणजे ‘इकीगाई’. जपानी लोकांच्या जीवनाला ती दिशा देते. यामुळेच जगातील सर्वांत वृद्ध लोकांचे छोटे शहर ‘ओगिमी’मध्ये एक अभूतपूर्व मैत्रीपूर्ण वातावरण असते. येथे प्रत्येकाला भाऊबंदकीची वागणूक दिली जाते. येथे लहानपणापासूनच ‘युइमारू’ म्हणजेच टीमवर्कचा अवलंब केला जातो आणि म्हणून एकमेकांना मदत करण्याची त्यांच्यात सवय असते.
-भारतीय दृष्टिकोनातून ‘इकीगाई’चे वर्णन कसे कराल?
जर आपल्याला दीर्घ आणि तणावमुक्त जीवन हवे असेल तर आपल्याला जपानी तत्त्वज्ञानाचा मूलभूत विचार स्वीकारावा लागेल. याचा अर्थ भरपूर फळे, भाज्या, काजू आणि शेंगा असलेला संतुलित आहार घ्यायला हवा. साखर आणि मीठ याचा वापर फार कमी करायला हवा. आपले सर्व मित्र आणि नातेवाइकांचा सन्मान व आदर करायला हवा. कोणत्याही प्रकारे तंबाखूचे सेवन टाळायला हवे. अल्कोहोलचे सेवन फारच कमी असायला हवे.
-नियमित व्यायामामुळे आयुर्मान वाढू शकते का?
व्यायाम आपल्या जीवनाचा सर्वांत महत्त्वाचा भाग असायला हवा. नियमित व्यायामामुळे वजन, रक्तदाब, कोलेस्टेरॉल कमी होते, सोबतच सर्व प्रकारचे संधिवातदेखील कमी करते. तुम्ही व्यायाम करता तेव्हा तुम्हाला बरे वाटते. हे एंडॉर्फिन नावाच्या हार्माेन्सच्या स्रावामुळे होते.
-ज्यांनी आयुष्याचे शतक झळकावले त्यांचे मत?
वयाच्या ११७ पर्यंत जगलेल्या ‘मिसाओ’च्या मते, विश्रांती घ्यायला शिका. ११६ वर्षे जगलेल्या ‘मारिया’ने कधीही मांस खाल्ले नाही. १२२ वर्षे जगलेली ‘जीन क्लेमेंट’ खूप मजेदार होती. आपला १२० वा वाढदिवस साजरा करीत असताना त्या म्हणाल्या होत्या की, मी नीट पाहू शकत नाही, मला नीट ऐकू येत नाही; पण सर्व काही ठीक आहे. वयाच्या ११४ व्या वर्षी ‘वॉल्टर’ म्हणायचे की जर तुम्ही तुमचे मन आणि शरीर व्यस्त ठेवले तर तुम्ही दीर्घ आयुष्य जगू शकाल. ‘अलेक्झांडर इमिच’ने त्याच्या दीर्घायुष्याचे श्रेय कधीच दारू न पिण्याला दिले. जेव्हा त्यांना त्याच्या दीर्घायुष्याचे रहस्य विचारले असता, ते म्हणतात, ‘मला माहीत नाही. मी अजून मेलो नाही.’
-आपण ‘इकीगाई’च का स्वीकारली पाहिजे?
जरी तुम्हाला काम करण्याची गरज नसली तरी तुमच्या जीवनाचा एक उद्देश असायला हवा, म्हणजे ‘इकीगाई’. एक हेतू जो तुम्हाला जीवनासाठी उत्साही ठेवेल. समाजासाठी आणि स्वत:साठी सुंदर आणि उपयुक्त कार्य करण्यासाठी प्रेरणा देत राहील.
-आजच्या वैद्यकीय व्यवस्थेत इकीगाई म्हणजे काय?
आपण आपला रक्तदाब (१२०/८०), रक्तातील ग्लुकोज (फास्टिंग -१०० मिग्रॅ, पोस्टमील -१६० मिग्रॅ), कोलेस्टेरॉल (१९० एमजीच्या खाली) नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. साखर आणि मिठाचे प्रमाण कमी करून वजन नियंत्रणात ठेवायला हवे. डॉक्टरांच्या शिफारशीनुसार दररोज ४५ मिनिटे चालणे किंवा व्यायाम करायला हवा आणि नियमित वैद्यकीय तपासणी करायला हवी. जेणेकरून प्रारंभिक टप्प्यावर आणि रोग गंभीर होण्यापूर्वी उपचार शोधून उपचार शक्य होईल.
-मानसिक आरोग्याबद्दल?
सकारात्मक विचार करायला हवा. आपल्या मर्यादा जाणून घ्यायला हवे. ध्येय निश्चित करायला हवे. सकारात्मकतेसह भावनिक अडथळ्यांवर मात करायला हवी. वय काहीही असो, काहीतरी नवीन शिकत राहणे दीर्घायुष्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरते.
-तर जीवनाची इकीगाई काय असावी?
आजच्या आधुनिक युगातही वयाच्या १०० व्या वर्षापर्यंत जगण्याचे ध्येय असले पाहिजे. आनंदी राहून दुसऱ्यांना आनंद द्यायला हवा. इतरांना नेहमीच मदत करायला हवी. प्रत्येकाशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवायला हवेत. समाजाला आणि देशाला कोणत्या ना कोणत्या प्रकारे योगदान देत राहायला हवे. योग्य आहार, व्यायाम करून धूम्रपान-अल्कोहोलपासून दूर राहायला हवे. कठीण परिस्थितीतही आनंदी असणे ही तुमची जगण्याची पद्धत असायला हवी.