मुख्यमंत्र्यांच्या दालनात बैठक : सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासननागपूर : हलबा समाजातील जे अधिकारी व कर्मचारी शासकीय नोकरीवर लागलेत, त्यांना १९९५ च्या जीआर प्रमाणे संरक्षण देण्यासंबंधी सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिष्टमंडळाला दिले. हलबा समाजातील एका शिष्टमंडळासोबत मुंबईत मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या दालनात बैठक झाली. या बैठकीत नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, सुधाकर देशमुख आणि सुधाकर कोहळे यांच्यासह धनंजय धार्मिक, चंद्रभान पराते, नंदा पराते, प्रकाश निमजे, दे.बा. नांदकर आदी समाजातील मान्यवर उपस्थित होते. हलबा समाजातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना नोकरीमध्ये संरक्षण देण्यात यावे, जात वैधता लागू करण्यात येऊ नये, जात पडताळणी समिती रद्द करण्यात यावी, आदी मागण्यांवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. यासंबंधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधी व न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांना सकारात्मक निर्णय घेण्याच्या सूचना केल्या. चर्चेचा एकूण सूर पाहता हलबा समाजाला न्याय मिळेल, असा विश्वास आमदार विकास कुंभारे यांनी व्यक्त केला आहे. बैठकीत हेमंत बराडे, डी.के. धापोडकर, पुरुषोत्तम सेलुकर, राजू डेकाटे, नागोराव पराते, मनोहर घोरडकर, ओमप्रकाश पाठराबे, हरिभाऊ नंदनवार, विलास पराते आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
हलबा समाजाला मिळणार नोकऱ्यात संरक्षण
By admin | Updated: August 8, 2015 02:59 IST