लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘लॉकडाऊन’च्या कालावधीतील वीज बिलाच्या मुद्द्यावरून राज्यात राजकारण तापलेले दिसून आले. विशेष म्हणजे उपराजधानीत तर या मुद्द्यावरून आजी-माजी ऊर्जामंत्री आमनेसामने आल्याचे दिसून आले. माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडी शासनाच्या विरोधात भाजपच्या आंदोलनाचे जिल्ह्यात नेतृत्व केले. तर दुसरीकडे विद्यमान ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी तातडीने पत्रपरिषद घेऊन भाजपच्या आंदोलनावर टीकास्त्र सोडत आंदोलन फसल्याचा दावा केला. एकूणच या मुद्द्यावरून एकमेकांवर राजकीय कुरघोडी करण्याचा दोन्ही नेत्यांचा प्रयत्न समोर आला.
‘लॉकडाऊन’च्या कालावधीतील वाढीव वीजबिलमाफी करणे तसेच वीजबिलात सवलत देण्याची ऊर्जामंत्र्यांची आश्वासने हवेतच राहिली. याविरोधात भाजपने राज्यभरात पाचहून अधिक वेळा आंदोलने केली. मात्र महाविकास आघाडी शासनाने ऊर्जामंत्र्यांच्या घोषणेची पूर्तता करण्यासाठी पावले उचलली नाहीत. त्यामुळे भाजपने शुक्रवारी आणखी एक आंदोलन केले. नागपूर जिल्ह्यात बावनकुळे यांच्याकडे आंदोलनाचे नेतृत्व होते. आंदोलनादरम्यान त्यांनी राऊत यांच्यावर ‘हल्लाबोल’ केला. भाजपने जिल्ह्यात व शहरात महावितरणच्या कार्यालयांना कुलूप ठोकून शहरातच वास्तव्याला असलेल्या ऊर्जामंत्र्यांचा निषेध केला. यानंतर काहीच वेळात राऊत यांच्या कार्यालयातून पत्रपरिषदेचे संदेश आले. पत्रपरिषदेदरम्यान राऊत यांनी माजी ऊर्जामंत्र्यांच्या कार्यकाळातच गैरप्रकार झाल्याचा आरोप केला. कुणाचेही नाव न घेता अस्तित्व वाचविण्यासाठी असे आंदोलन करण्यात येत असल्याचेदेखील ते म्हणाले. २०१४ ते २०१९ या कालावधीत महावितरणची १४ हजार १५४ कोटींवरील थकबाकी ४१ हजार १३३ कोटींवर कशी गेली, असा प्रश्न उपस्थित केला. इंधन दरवाढीवरुन त्यांनी भाजप नेत्यांच्या भूमिकेवरदेखील प्रश्न उपस्थित केले. वीजबिलाच्या मुद्द्यावरील आंदोलन सुरू असताना दुसरीकडे शिवसेनेकडून इंधनदरवाढीविरोधात आंदोलन करण्यात आले.