लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अखेरच्या श्वासापर्यंत, गरीबांच्या वेदनेचा आणि सामाजिक जाणीवेचा हुंकार झालेले आंबेडकरी व बौद्ध चळवळीतील ज्येष्ठ व सक्रिय कार्यकर्ते, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कर्करोग विभागाचे माजी विभागप्रमुख कर्करोग तज्ज्ञ डॉ. कृष्णा कांबळे (७२) यांचे शुक्रवारी दुपारी निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, एक मुलगी व आप्तपरिवार आहे. डॉ. कृष्णा कांबळे हे सामाजिक जाणिवेचे डॉक्टर म्हणून परिचित होते. मेडिकलमधून सेवानिवृत्त झाल्यानंतरही त्यांनी अनेक वर्षे मेडिकलमध्ये सेवा दिली. त्यांच्या जाण्याने तथागताची समतेची चळवळ आणि माणूसपण जपणारा प्रत्येक व्यक्ती पोरका झाला आहे.
डॉ. कांबळे आंबेडकरी चळवळ व बौद्ध धम्म कार्यात सक्रिय होते. मागील काही वर्षांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त नागरी जयंती साजरी केली जाते. या समितीचे ते माजी अध्यक्षही होते. राज्य शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य सचिव म्हणून त्यांची अलीकडेच नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी ऑनलाईन पदभारही बाबासाहेबांच्या खंड प्रकाशनाच्या दृष्टीने कामाला सुरुवातही केली होती. नागपुरातील शासकीय मुद्रणालयात जाऊन त्यांनी अनेक ग्रंथही पडताळून पाहिले होते. खंड प्रकाशनाच्या दृष्टीने नियोजनही केले होते. यादरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले जाते. ते काही दिवसापासून मेडिकलमध्ये भरती होते. प्रकृती बिघडल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. शुक्रवारी दुपारी ३.५० वाजताच्या सुमारास त्यांचे निधन झाले.