नागपूर : पेट्रोलियम कंपन्यांनी ऑगस्ट महिन्यात पुन्हा एकदा घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात २५ रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे आधीच महागाईला तोंड देत असलेल्या सर्वसामान्य माणसाला आणखी फटका बसणार आहे. नागपुरात जुलैमध्ये ८८६ रुपयांत मिळणारे १४.२ किलो घरगुती एलपीजी गॅस सिलिंडर आता ऑगस्टमध्ये ९११.५० रुपयांवर पोहोचले आहे. जानेवारी २०१८ मध्ये सिलिंडरचे दर ९९३ रुपये होते, हे विशेष.
सर्वसाधारणपणे पेट्रोलियम कंपन्या एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत दर महिन्याच्या पहिल्या तारखेला बदल करतात; पण यावेळी ऑगस्ट महिन्यात १६ तारखेला दरवाढ केली आहे. वर्षभरात सिलिंडरच्या किमतीत २६६ रुपयांची वाढ झाली आहे. तर यावर्षी आठ महिन्यांत सिलिंडर १६५ रुपयांनी वाढले आहे. या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारीला ७३६ रुपये, फेब्रुवारी ७४६, मार्च ८७१, एप्रिल ८६१, मे ८६१, जून८६१, जुलै ८८६ आणि ऑगस्ट महिन्यात ९११ रुपये भाव झाले आहेत. एप्रिल, मे आणि जून महिन्यात भाव स्थिर होते. ९११ रुपयांच्या सिलिंडरवर राज्य सरकारतर्फे २१.७० रुपये व केंद्रातर्फे २१.७० रुपये अर्थात ४३.४० रुपये जीएसटी आकारण्यात येतो.
आधीच वाढत्या महागाईमुळे त्रस्त असलेला सर्वसामान्य माणसाला घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या वाढलेल्या दरामुळे मोठाच फटका बसला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळेदेखील नागरिक आधीच हैराण झालेले आहेत. इंधन दरवाढीमुळे नागरिकांना इतर महागाईला तोंड द्यावे लागत आहे. कारण दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या वाहतुकीचा खर्च वाढत असल्याने त्यांच्याही किमतीत वाढ होत आहेत.
महिना दर (रुपयांत)
जानेवारी ७४६
फेब्रुवारी ७४६
मार्च ८७१
एप्रिल ८६१
मे ८६१
जून ८६१
जुलै ८८६
ऑगस्ट ९११
सबसिडी केवळ ४०.१० रुपये
मे २०२० पासून केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडरवर प्राइस रेटनुसार सबसिडी देणे बंद केले आहे. जवळपास १५ महिन्यांपासून ग्राहकांच्या बँक खात्यात केवळ ४०.१० रुपये सबसिडी जमा होत आहे. त्या तुलनेत सिलिंडरचे दर प्रत्येक महिन्यात वाढत आहे. पुढे सबसिडी बंद होणार असल्याचे यावरून दिसून येते. सबसिडी पुन्हा सुरू करण्याची ग्राहक संघटनांची मागणी आहे. सबसिडीअभावी केंद्र सरकारच्या उज्ज्वला योजनेला फटका बसणार आहे. सरकार कमी उत्पन्न गटातील महिलांना गॅस शेगडी व सिलिंडर मोफत देतील; पण पुन्हा ९११ रुपयांचे नवीन सिलिंडर खरेदी करणे त्यांना परवडणारे नाही. ही योजना पुढे थंडबस्त्यात जाणार असल्याचे ग्राहक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
व्यावसायिक सिलिंडर पाच रुपयांनी स्वस्त
व्यावसायिक सिलिंडरचे भाव वर्षभरात ४३० रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे हॉटेल व रेस्टॉरंटला जास्त दरात सिलिंडर विकत घ्यावे लागत आहे. जीवनावश्यक वस्तू आणि इंधनाचे दर वाढल्याचा फटका हॉटेल्स व रेस्टॉरंटला बसत आहे. ऑगस्टमध्ये पाच रुपयांची घसरण झाली आहे. सध्या १९ किलो सिलिंडरचे दर १७५९ रुपयांवर पोहोचले आहे. प्रत्येक महिन्यात दर वाढत असल्याने व्यावसायिक त्रस्त आहेत.
शहरात चुली कशा पेटवायच्या?
सिलिंडरच्या दरवाढीने केंद्र सरकारच्या उज्ज्वला गॅस योजनेला फटका बसणार आहे. गरीब महागडे सिलिंडर कसे विकत घेणार? सिलिंडरच्या किमती वाढल्याने महिलांना पुन्हा चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे. आता लाकडेही मिळत नाही. अशा वेळी महिलांनी काय करायचे, हा गंभीर प्रश्न आहे.
शीतल दमके, गृहिणी.
मागील काही दिवसांपासून सिलिंडरचे दर सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांनी कसे जगावे, हा प्रश्न आहे. सिलिंडरचे दर वाढवायचे होते तर उज्ज्वला योजना सुरू करून महिलांना सिलिंडरवर स्वयंपाक करण्याची सवय का लावली, पूर्वी त्या चुलीवर स्वयंपाक करीतच होत्या. सरकारने योजनेत दर कमी ठेवावेत.
-शकुंतला बाभळे, गृहिणी.