भिवापुरातील ३८ घरांचा सफाया : काही काळ तणावाचे वातावरणभिवापूर : दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या भिवापुरातील प्रस्तावित जागेवरील अतिक्रमण बुधवारी पोलीस बंदोबस्तात हटविण्यात आले. ३८ घरांचा सफाया करण्यात आला. यामुळे काही काळ तेथे तणावाचे वातावरण तयार झाले होते. महसूल विभाग, पोलीस विभाग आणि ग्रामपंचायत प्रशासनाच्या दीडशेवर अधिकारी -कर्मचाऱ्यांच्या ताफ्यात हे अतिक्रमण हटविण्यात आले. बुधवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास अतिक्रमण हटविण्यासासाठी ताफा घटनास्थळी दाखल झाला. ध्वनिप्रक्षेपकाद्वारे सूचना देत घरातील साहित्य बाहेर काढण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले. त्यानंतर जेसीबीच्या साहाय्याने घरे पाडण्यात आली. घरे पाडत असल्याचे पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रू होते. जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील वॉर्ड क्र. १ मधील गट नं. ३२५ व ३२६ मधील अनुक्रमे ४ व ५ एकर अशी एकूण ९ एकर शासकीय जागा न्यायालयाला देण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आला होता. मात्र अंतर्गत राजकारणामुळे हा प्रस्ताव तब्बल दोन वर्ष धूळखात होता. दीड वर्षापूर्वी या प्रस्तावाला मंजुरी मिळाली. मात्र सदर जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण असल्यामुळे पेच निर्माण झाला. सदर अतिक्रमण हटविण्यासाठी प्रशासनाकडून अनेकदा प्रयत्न झाले. मात्र त्यात यश मिळाले नाही. गेल्या दोन महिन्यांपासून अतिक्रमण हटविण्यासाठी प्रशासनाच्या हालचाली जलद झाल्या होत्या. नोटीस, बैठकासुद्धा घेण्यात आल्या. एकूण नऊ एकर प्रस्तावित जागेपैकी एक एकर जमिनीवर तब्बल ३८ अतिक्रमणधारकांनी अतिक्रमण केले आहे. यात काही पक्क्या घरांचासुद्धा समावेश आहे. अतिक्रमण हटविणे सोयीचे व्हावे म्हणून प्रशासनाने पीडितांना आबादीच्या भूखंडातील ४८४ चौरस फुटाचे भूखंड देण्याची तयारी दर्शविली. यातील १५ अतिक्रमणधारकांनी त्याला सहमती दिली. परंतु उर्वरित २३ जणांनी त्यास विरोध केला. न्यायालयाशी संबंधित विषय असल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार उपविभागीय अधिकारी उमेश काळे यांनी अतिक्रमण हटविण्याची तयारी चालविली. त्यानुसार नोटीस देत साहित्य हटविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार हे अतिक्रमण बुधवारी हटविण्यात आले. या मोहिमेत उपविभागीय अधिकारी उमेश काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी शंकरसिंग राजपूत, तहसीलदार शीतलकुमार यादव, पोलीस निरीक्षक मनीष दिवटे, नायब तहसीलदार अशोक मोहाडीकर, शिंदे यांच्यासह इतर सहा पोलीस अधिकारी, भिवापूर, उमरेड कुही, बेला, वेलतूर, क ामठी, बुटीबोरी ठाण्यातील ५५ पोलीस कर्मचारी, १५ महिला पोलीस असे एकूण ७६ पोलीस, मंडळ अधिकारी, तालुक्यातील तलाठी, ग्रामसेवक, कर्मचारी आदी १५० हून अधिक कर्मचाऱ्यांचा या मोहिमेत सहभाग होता. (तालुका प्रतिनिधी)गुंफाच्या नशिबी दु:खच!आई-वडिलांच्या विरोधानंतरही गुंफा आणि प्रीतम बोरकरने प्रेमविवाह केला. घरापासून दूर म्हणून त्यांनी न्यायालयाच्या या प्रस्तावित जागेवर झोपडी उभारून संसार थाटला. ते दोघेही मोलमजुरी करीत. त्यांच्या संसारात फूल उमलणार तोच एका अपघातात प्रीतमचा मृत्यू झाला. तरीही गुंफा खचली नाही. तिला मुलगा झाला. तो एका पायाने अपंग असून आता अडीच वर्षांचा आहे. कुटुंबापासून दूर राहणाऱ्या गुंफावर नियतीने प्रहार करीत पतीला दूर केले. त्यानंतर कशीतरी ती उभी असताना अतिक्रमणात तिची झोपडी हटविण्यात आली. शासन भूखंड देण्यास तयार आहे. मात्र त्यासाठी लागणारे शुल्क भरण्याइतपत रक्कम तिच्याकडे नाही. झोपडी हटविताच कुठे जावे, कुठे राहावे असे एक ना अनेक प्रश्न तिच्यासमोर उभे राहिले. अधिकारी- कर्मचारी अतिक्रमण हटविण्यात मग्न असताना गुंफा मात्र हुंदके देत रडत होती. तिच्या कडेवर बसलेला अडीच वर्षांचा प्रतीकसुद्धा आईकडे पाहून रडत होता.
न्यायालयाचा मार्ग मोकळा
By admin | Updated: January 15, 2015 00:55 IST