लाेकमत न्यूज नेटवर्क
सावरगाव : काेराेना चाचणी पाॅझिटिव्ह आल्याने डाॅक्टरांनी त्या रुग्णाला गृह विलगीकरणात राहण्याचा व घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला. मात्र, सावरगाव (ता. नरखेड) येथील एक रुग्ण विलगीकरणाचा काळ संपण्याच्या आधीच गावात मुक्तपणे विनामास्क फिरत असल्याचे गुरुवारी आढळून आले. या व्यक्तीवर स्थानिक ग्रामपंचायत आणि तालुका प्रशासन काय कारवाई करणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
गावात काेराेना संक्रमित रुग्णांची संख्या वाढत आहे. ग्रामपंचायतीच्या कचरा संकलन करणाऱ्या घंटागाडीवरील कर्मचारी काेराेना संक्रमित असल्याचे ४ एप्रिल राेजी स्पष्ट झाले. हा कर्मचारी गावात दवंडी देण्याचेही काम करताे. ताे संक्रमित असल्याचे स्पष्ट हाेताच डाॅक्टरांनी त्याला १४ दिवस गृह विलगीकरणात राहण्याचा सल्ला देत त्याच्यावर औषधाेपचार सुरू केो. दरम्यान, हा कर्मचारी गुरुवारी (दि. १५) गावात फिरत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले.
महत्त्वाचे म्हणजे, या कर्मचाऱ्याची पत्नी ग्रामपंचायत सदस्या आहे. ग्रामपंचायत कर्मचारी जर काेराेना प्रतिबंधक उपाययाेजनांचे पालन करीत नसेल, काेराेनाबाधित असतानाही गावात मुक्तसंचार करीत असेल, तर प्रशासन त्याच्यावर काय कारवाई करणार, असा प्रश्नही नागरिकांनी उपस्थित केला आहे. सामान्य माणसाने नियमाचा भंग केल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला जाताे. या कर्मचाऱ्यावर ग्रामपंचायत व तालुका प्रशासन कारवाई करते, की त्याला पाठीशी घालते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
....
अन् पळ काढला
याबाबत त्या कर्मचाऱ्याला विचारणा केली असता, सुरुवातीला त्याने असंबद्ध उत्तरे देत आपला विलगीकरणाचा काळ संपल्याचे सांगितले. त्यानंतर नागरिकांनी त्याला १४ दिवसांचा काळ व त्याची ४ एप्रिल राेजी केलेली टेस्ट, तसेच आराेग्य विभागातील कर्मचारी व पाेलिसांना बाेलावण्याची तंबी देताच त्याने तिथून लगेच पळ काढला. विशेष म्हणजे, त्याने मास्क हा नाक व ताेंड झाकेल अशा पद्धतीने न लावता ताे हनुवटीला लावला हाेता.
...
हा कर्मचारी गुरुवारी दुपारी २ च्या सुमारास ग्रामपंचायत कार्यालयात आला हाेता. आपण त्याला, तू काेराेना पाॅझिटिव्ह असताना व तुझा गृह विलगीकरणाचा काळ संपायचा असताना ग्रामपंचायत कार्यालयात का आला, अशी विचारणा केली. त्याला लगेच घरी जाण्याची सूचना केली.
- रमेश बन्नगरे,
ग्रामविकास अधिकारी, सावरगाव.