नागपूर : खाकी गणवेश आणि हातात काठी घेऊन जंगलाची सुरक्षा करणार्या वनरक्षकाच्या हाती आता लवकरच अत्याधुनिक शस्त्रासह अँन्ड्राईड फोन दिसू लागणार आहे. वन विभागाने बहेलियासारख्या शिकारी टोळींचा तेवढय़ाच ताकदीने सामना करण्यासाठी वनरक्षकाला ‘हायटेक’ करण्याचा निर्णय घेतला आहे. यात वन्यप्राण्यांच्या सुरक्षेसाठी जंगलात तैनात असलेल्या प्रत्येक वनरक्षकांकडे अत्याधुनिक अँन्ड्रॉईड सॉफ्टवेअर असलेला मोबाईल फोन दिला जाणार असल्याची माहिती एका वरिष्ठ वन अधिकार्याने दिली. ते पुढे म्हणाले, वन विभागाने प्रायोगिक तत्त्वावर पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालयातील सुमारे सात वन कर्मचार्यांना हा फोन दिला आहे. शिवाय त्यासंबंधी विभागीयस्तरावर प्रशिक्षणही दिले जात आहे. यानंतर पुढील वर्षभरात संपूर्ण राज्यभरात सुमारे ५ हजार मोबाईल वाटप करण्याची योजना आहे. सध्या जंगलात एखादी शिकार, वृक्षतोड किंवा आगीसारखी घटना घडल्यास संबंधित वन कर्मचारी त्या घटनेचा पंचनामा करून, गुन्हा दाखल करतो. त्यानंतर तो रिपोर्ट टपाल किंवा डाकेच्या माध्यमातून मुख्यालयातील वरिष्ठांकडे पाठवितो. मात्र तो वरिष्ठांपर्यंंत पोहोचण्यासाठी किमान एक आठवड्याचा कालावधी लागतो. यामुळे अनेकदा वरिष्ठांना त्या घटनेवर योग्य कारवाई करता येत नाही. शिवाय आरोपीही निर्दोष सुटण्याची शक्यता असते. परंतु आता संबंधित वन कर्मचारी या नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने जंगलात कोणतीही घटना घडल्यास त्याबाबतचा रिपोर्ट तात्काळ वरिष्ठांपर्यंंंत पाठवू शकणार आहे. सोबतच अँन्ड्राईड फोनच्या माध्यमातून घटनेचे छायाचित्रही वरिष्ठांकडे पाठविता येणार आहे. यातून जंगलातील अवैध घटना रोखून शिकार्यांवर वचक निर्माण करण्यास मदत मिळणार आहे. (प्रतिनिधी)
वनरक्षक ‘हायटेक’ होणार!
By admin | Updated: June 2, 2014 02:18 IST