चंद्रपूर जिल्ह्यातील घटना : खाली पडून गंभीर जखमी
वरोरा : वादळात घरे, झाडे जमीनदोस्त होणे, घरावरील टीना, कवेलू, अन्य वस्तू उडून जाणे आदी घटना आपण नेहमीच बघतो. मात्र एखादी व्यक्ती वादळामुळे चक्क आकाशात उडाली असे दृश्य केवळ चित्रपटातच बघायला मिळते. परंतु प्रत्यक्षात हे दृश्य अनुभवले वरोरा तालुक्यातील बोरगाव वासियांनी. तालुक्यातील बोरगाव (शि) पांढरतळा, लोणार आदी गावांमध्ये ८ मे रोजी दुपारी ४ च्या सुमारास अचानक वादळ आले. यावेळी अनेक शेतकरी आपल्या शेतात काम करीत होते. अनेकांच्या घरावरील छत, घरातील सामानदेखील दोन ते तीन किमी अंतरापर्यंत उडून गेले. विद्युत खांब पडले. झाडे उमळून पडली. घरांना तडे गेले. पाऊस आल्याने घरातील धान्यही ओले झाले. त्यामुळे सर्वच संकटग्रस्त आपल्या वस्तू शोधण्यात व्यस्त होते. याच वादळात बोरगाव (शि) येथील श्रावण सखाराम नन्नावरे आपली गाईगुरे बांधण्यासाठी घराबाहेर पडले. गाईगुरांना बांधून बांधून घराकडे परत येत असताना ते वादळात सापडले. वादळाने त्यांना अक्षरश: जमिनीवरुन उचलून घेतले. काही वेळ ते आकाशात राहिले आणि वादळाचा वेग कमी होताच जमिनीवर कोसळले. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांच्या कंबरेला दुखापत झाल्याने वरोरा येथील खासगी रुग्णालयात त्यांचेवर उपचार सुरू आहेत. वीज पडून जखमी व मृत पावलेल्यांना तसेच वादळ, अकाली पाऊस गारपिटीने नुकसान झाल्यास शासन तातडीने मदत देते. वादळाच्या तडाख्यात सापडलेल्या या जखमीस देखील मदतीची अपेक्षा आहे. कारण तळहातावर पोट घेऊन जगणार्या श्रावण नन्नावरे यांना उपचाराचा खर्च झेपावणारा नाही. वादळ, अकाली पाऊस, गारपीट ही नैसर्गिक आपत्ती मानली जाते. त्यातील आपदग्रस्तांना मदत दिली जाते. त्यामुळे वादळात सापडून जखमी झालेल्या नन्नावरे यांना शासनाने त्वरित मदत द्यावी, अशी मागणी जि.प. सदस्य नितीन मत्ते यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)