उमरेड : प्रवाशांना घेऊन उमरेड येथून मालेवाडा गावाच्या दिशेने भरधाव निघालेल्या ओम्नी चालकाचा वाहनावरील ताबा सुटून ओम्नी उलटल्याची घटना शनिवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. गरडापार शिवारात झालेल्या या अपघातात पाच जण जखमी झाले. पैकी तीन गंभीर जखमींना नागपूर मेडिकलला रवाना करण्यात आले. जखमींमध्ये तीन महिलांचा समावेश आहे.
प्रकाश चोकोबा पिल्लेवार (५५, रा. पाहमी चिचाळा ता. भिवापूर), सुमन नामदेव गौरकार (६०, भिसी, ता. चिमूर), तेजस्विनी रोशन गायकवाड (२३, शिवापूर ता. भिवापूर), अमृत गवसू पाटील (५५, सेव, ता. उमरेड) आणि मंदा अमृत पाटील (५०) अशी जखमींची नावे आहेत.
शनिवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास ओम्नी (क्र. एमएच ३१ सीएन ९७०८) उमरेड येथून मालेवाडा गावाच्या दिशेने प्रवासी घेऊन येत होती. गरडापार शिवारात चालकाचा ताबा सुटल्याने ओम्नी उलटली. उमरेड पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास प्रभारी पोलीस निरीक्षक महेश भोरटेकर करीत आहेत.