लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संक्रमण नियंत्रण व कोविड केअर सेंटरवर काम करणाऱ्या अर्ध्याहून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांना कमी करण्यात आले आहे. काहींना लसीकरण केंद्रावर काम देण्यात आले. परंतु त्यांना आठवड्यातून तीन-चार दिवस काम दिले जात असल्याने, त्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.
लक्ष्मीनगर झोनमधील लसीकरण केंद्रावर काम करणाऱ्या काही आरोग्य कर्मचाऱ्यांना चार दिवस तर काहींना आठवड्यातून तीन दिवस काम दिले जाते. त्यात अधिकाऱ्यांच्या मर्जीतील कर्मचाऱ्यांना पूर्ण मोबदला मिळतो. तर इतरांना तसेच पाच ते सहा दिवस काम केले तरी पूर्ण दिवसाचे मानधन मिळत नाही. तक्रार केली तर कामावरून कमी करण्याच्या भीतीपोटी तक्रार करण्यासाठी कुणीही पुढे येत नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेण्याची गरज आहे. अशीच परिस्थिती मनपाच्या अन्य झोनमध्ये असल्याच्या तक्रारी आहेत.
कोरोना संक्रमण काळात रुग्णालयात काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना कोविड नियंत्रण व कोविड केअर सेंटरवर कामावर ठेवले होते. रुग्णांची संख्या कमी झाल्याने बहुसंख्य कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. आधी त्यांना १५ ते २५ हजार मानधन दिले जात होते. लसीकरण केंद्रावरील कर्मचाऱ्यांना ७०० रुपये याप्रमाणे मजुरी दिली जात आहे. त्यांना कुठल्याही प्रकारची सुरक्षा नाही.