भिवापूर/भगवानपूर : दिवाळीच्या सणासुदीकरिता गोरगरीब ग्राहकांसाठी आलेली साखर स्वस्त धान्य दुकानदाराने गिळंकृत केल्याचे प्रकरण लोकमतने उजेडात आणले. याबाबत ग्रामस्थांनी अनेकदा तक्रारी केल्यात. दोन वर्षांपासून प्रशासकीय दालनात धूळ खात असलेल्या या प्रकरणाची फाइल आता पुन्हा टेबलवर येताच अधिकाऱ्यांनी थेट दुकानाचा परवानाच निलंबित केला. त्यामुळे स्वस्त धान्याची अफरातफर करणाऱ्यांत धडकी भरली आहे. प्रज्ञाशील महिला बचतगट, भगवानपूर असे या परवानाप्राप्त स्वस्त धान्य दुकानचालक महिला बचतगटाचे नाव आहे. नोव्हेंबर २०१८ मध्ये दिवाळीचे औचित्य साधून शासनाने सामान्य ग्राहकांसाठी स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून साखर उपलब्ध करून दिली. मात्र ही साखर सामान्य ग्राहकांना वितरित न करता दुकानचालक बचतगटाने स्वत:च गिळंकृत केली. याबाबत लोकमतने ‘ती साखर कुणाच्या घशात?’ या शीर्षकाखाली वृत्त प्रकाशित करत प्रकरणाला वाचा फोडली होती. त्यानंतर समाजिक कार्यकर्ते अरुण मुन व ग्रामस्थांनी या दुकानाविरोधात उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्याकडे तक्रार केली. चौकशीमध्ये साखर वितरण झाले नसल्याचे निदर्शनास आले. मात्र तरीही दोन वर्षे प्रकरण थंडबस्त्यात गेले. अखेरीस मुन यांनी प्रशासनाला निवेदन देत सदर दुकानाचा परवाना २५ जानेवारी २०२१ पर्यंत रद्द करावा. अन्यथा ग्रामस्थांच्या सहभागात २६ जानेवारीपासून आमरण उपोषणास बसण्याचा अल्टीमेटम दिला. याची दखल घेत जिल्हा पुरवठा अधिकारी भाष्कर तायडे यांनी २२ जानेवारी २०२१ रोजी आदेश देत भगवानपूर येथील प्रज्ञाशील महिला बचतगटाचा स्वस्त धान्य दुकानाचा परवाना निलंबित केला.
काय म्हणतो आदेश
?
प्राप्त चौकशी अहवालाच्या आधारे जिल्हा पुरवठा अधिकारी भाष्कर तायडे यांनी सदर दुकानाचा परवाना निलंबित केला. दुकानदाराने ऑफलाइन वितरण केल्याचे सांगितले असले तरी त्यांच्याकडे ऑफलाइन वाटपाचे योग्य नमुन्यात दस्तऐवज उपलब्ध नाही. नोव्हेंबरमध्ये शासनाकडून वितरणासाठी आलेली साखर प्रत्येकी कार्ड १ किलोप्रमाणे मिळाली नसल्याचे आठ शिधापत्रिकाधारकांनी आपल्या बयानात सांगितले आहे. वजन व मापांचे नूतनीकरण झाले नाही. अंत्योदय व प्राधान्यगट शिधापत्रिकाधारकांची यादी प्रसिद्धीसाठी ठेवलेली नव्हती. रास्त भाव दुकानाचा फलक, वेळ दर्शविणारा फलक अद्ययावत स्वरूपात लावलेला नव्हता. दक्षता समितीचा फलकसुद्धा नव्हता. असे मुद्दे चौकशी अहवालात नमूद करण्यात आले आहेत. २२ जानेवारीपासून पुढील चौकशीपर्यंत सदर दुकानाचा परवाना निलंबित करण्यात येत असल्याचे आदेशात नमूद आहे.