नागपूर : विजेचा पुरवठा खंडित केल्यामुळे संतप्त झालेल्या विदर्भ आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांनी महावितरणच्या कार्यालयात गोंधळ घालून आत्महत्येचा प्रयत्न केला. याप्रकरणी लकडगंज पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
ओमकारनगरातील पराग शिवचरण फाटे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, वर्धमान नगरातील महावितरणच्या कार्यालयात बुधवारी सायंकाळी ५.४० च्या सुमारास ते हजर होते. तेथे आरोपी राजेश सुदाम बंड तसेच विदर्भ आंदोलन समितीचे कार्यकर्ते आले. त्यांनी फाटे यांना बंड यांच्याकडील विद्युत पुरवठा का खंडित केला, असा प्रश्न केला. ६५ हजारांची बिल थकबाकी असल्यामुळे वीजपुरवठा खंडित केल्याचे फाटे यांनी सांगितले. त्यावरून आरोपी बंड, बांबोडे मासुरकर आणि त्यांच्या साथीदारांनी कार्यालयात गोंधळ घातला. त्याचप्रमाणे एकाने कार्यालयातच आत्महत्येचा प्रयत्न केला. फाटे यांच्या तक्रारीवरून लकडगंज पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला.