आजोबा आणि मामानेच केला तरुणीचा खून
सतीश येटरे - यवतमाळ
सुमारे साडेतीन महिन्यांपासून रहस्यमयरीत्या बेपत्ता असलेल्या तरुणीचा खून चक्क आजोबा आणि मामानेच केल्याचे खळबळजनक वास्तव पुढे आले. अनैतिक संबंधाच्या संशयातून जंगलात नेऊन ओढणीने गळा आवळून तिला यमसदनी धाडल्याची कबुली त्यांनी पोलिसांपुढे दिली. समाजमन सुन्न करणारा हा आॅनर किलिंगचा प्रकार घाटंजी तालुक्यातील बोधडी येथे उघडकीस आला. पोलिसांनी आजोबा आणि मामाला बेड्या ठोकल्या. संगीता बाबूलाल गाडेकर (१८) रा. बोधडी असे मृत तरुणीचे नाव आहे. १६ फेब्रुवारी रोजी ती रहस्यमयरीत्या बेपत्ता झाली होती. शोध घेऊनही संगीता आढळून आली नाही. त्यामुळे नातेवाईकांनी पारवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. दरम्यान, २८ फेब्रुवारीला घाटंजी तालुक्यातील पाटापांगरा येथील जंगलात एका वृक्षाच्या बुंद्याजवळ संगीताचा मृतदेह २० ते २५ दगडांखाली लपविलेल्या अवस्थेत आढळला होता तसेच तिच्या गळ्याला ओढणी बांधून होती. पोलिसांनी पंंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. अहवालात संगीताचा खून ओढणीने गळा आवळून झाल्याचे पुढे आले. तिचा खून एक ते दीड महिन्याअगोदर झाल्याचेही अहवालात नमूद होते. त्यावरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भादंवि ३०२, ४१७ कलमान्वये खून आणि पुरावे नष्ट केल्याचा गुन्हा दाखल केला होता. मात्र घटना उजेडात येऊन तीन महिने उलटले तरी आरोपीचा कुठलाही धागादोरा गवसत नव्हता. दरम्यान, ९ मे रोजी पांढरकवडा उपविभागीय पोलीस अधिकारी बी.एस. महाजन आणि ठाणेदार संजय शिरभाते यांनी संशयावरून संगीताचे आजोबा काशिराम भवान्या टेकाम (६०), मामा श्याम काशिराम टेकाम (२२) दोघेही रा. बोधडी यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. ठाण्यात आणून दोघांचीही कसून चौकशी करण्यात आली. सुरुवातीला नन्नाचा पाढा वाचणारा काशिराम आणि श्याम दोघेही पोपटासारखे बोलू लागले. या वेळी दोघांनीही एसडीपीओ महाजन यांच्यासमोर संगीताचा गळा आवळून खून केल्याची कबुली दिली. तसेच घटनेच्या एक दिवसापूर्वी शेजारीच राहणार्या भीमीबाई टेकाम हिने आपल्या पतीशी अनैतिक संबंध असल्याचा संशय उपस्थित करुन संगीताशी वाद घातला. ती गर्भवती असल्याचा संशय कुटुंबीयांना होता. त्यामुळेच त्यांनी तिला धाकदपट करून विचारणा केली. मात्र संगीताने ब्र काढला नाही. बदनामीच्या भीतीतून काशिराम आणि श्यामने तिचा कायमचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. १६ फेब्रुवारीला पहाटेच काशिराम आणि श्यामने मोठ्या देवाकडे दर्शनाला जायचे असल्याचे सांगून संगीताला सोबत घेतले. तिघेही पायीच पाटापांगरा जंगलाकडे निघाले. जंगलात पुन्हा संगीताला विचारणा करण्यात आली. या वेळीही तिने नकार दिला. त्यामुळे काशिराम आणि श्याम चांगलेच संतापले. त्यांनी तिला जीवे मारण्याची धमकी दिली. तेव्हा संगीताने मरायला भीत नसल्याचे म्हटले. त्यामुळे श्यामने तिला घट्ट धरून ठेवले तर काशिरामने ओढणीने गळा आवळला. त्यामध्ये संगीताचा श्वास रोखून जागीच मृत्यू झाला. त्यानंतर संबंधितांनी तिला एका वृक्षाच्या बुंद्याजवळील खड्ड्यात टाकून प्रेत दिसू नये म्हणून त्यावर २० ते २५ दगड ठेवल्याचेही त्यांनी कबुलीत सांगितले. त्यावरून ठाणेदार संजय शिरभाते यांनी दोघांनाही अटक केली. तसेच त्यांना न्यायालयापुढे हजर करण्यात आले. या वेळी न्यायालयाने आरोपी काशिराम आणि श्यामला १३ मे पर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.