नागपूर : गेल्या वर्षी अकराव्या वर्गाच्या शहरातील २१ हजार जागा रिक्त होत्या. यंदा हा आकडा ३० हजारावर जाणार आहे. एकतर एकूण जागेएवढी नोंदणीच झाली नाही. दुसरीकडे प्रवेश प्रक्रियेला उशीर झाल्याने अनेक विद्यार्थ्यांनी शहरालगतच्या ग्रामीण भागातील कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आहे. त्यामुळे किमान ५० टक्के जागा रिक्त राहतील, अशी भीती ज्युनिअर कॉलेजच्या मुख्याध्यापकांनी व्यक्त केली.
अकरावीच्या पहिल्या फेरीत १३४५४ प्रवेश निश्चित झाले होते. पहिल्या फेरीनंतर तब्बल दोन महिने प्रवेश प्रक्रिया ठप्प पडली होती. त्यामुळे कॉलेजमध्ये प्रवेश होतील की नाही, या भीतीपोटी २० टक्के विद्यार्थ्यांनी शहरालगतच्या ग्रामीण भागात प्रवेश केले. शहरातील काही नामांकित महाविद्यालय सोडल्यास, इतर ज्युनिअर कॉलेजमध्ये मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहणार आहे.
ज्युनिअर कॉलेजच्या मुख्याध्यापकांच्या मते दुसऱ्या राऊंडची प्रक्रिया सुरू झाली असली तरी, विज्ञान शाखेचे विद्यार्थी ग्रामीण भागात प्रवेश घेऊन मोकळे झाले आहे. ३४५८५ विद्यार्थ्यांचा भाग १ फॉर्म तपासण्यात आला असला तरी, प्रत्यक्षात ५० टक्केही विद्यार्थी प्रवेश घेतील का, अशी भीती आहे. पहिल्या राऊंडमध्ये १८१८२ विद्यार्थ्यांना कॉलेज वाटप झाले असताना केवळ १३४५४ विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतला. दुसऱ्या राऊंडमध्येही अशीच स्थिती बघायला मिळणार आहे.
- पहिल्या राऊंडनंतरची स्थिती
शाखा एकूण जागा झालेले प्रवेश रिक्त जागा
कला ९६६० १६०५ ८०५५
वाणिज्य १८००० ३९८४ १४०५२
विज्ञान २७३८० ७१४३ २०२३७
एमसीव्हीसी ४१३० ७५८ ३३७२