रोहणा खूनप्रकरण : सीआयडीने केला होता तपासनागपूर : जलालखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बहुचर्चित रोहणा येथील खून खटल्यात बुधवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. जे. राठी यांच्या न्यायालयाने एकाच कुटुंबातील वडील व दोन मुलांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. वसंता रामचंद्र जुनघरे, त्याची दोन मुले दिनेश आणि मंगेश, अशी आरोपींची नावे आहेत. रवींद्र राजेंद्र सोनोने (२७), असे मृताचे नाव होते. मृत आणि आरोपी रोहणा गावातीलच रहिवासी आहेत. खुनाची घटना २७ मार्च २०११ रोजी रोहणा येथील पीरबाबा दर्ग्याजवळील सिमेंट रोडलगतच्या आरोपी जुनघरे याच्या दुकानासमोर घडली होती. या घटनेच्या पूर्वी आॅगस्ट २०१० मध्ये जुनघरेकडे मावंद्याचा धार्मिक कार्यक्रम होता. त्यात रवींद्र सहभागी झाला होता. रवींद्र हा दारू पिण्याच्या सवयीचा होता. या कार्यक्रमातही त्याने भरपूर दारू पिऊन धिंगाणा घातला होता. त्यामुळे जुनघरे कुटुंबाने जलालखेडा पोलीस ठाण्यात मौखिक तक्रार नोंदवली होती. या घटनेपासून जुनघरे आणि रवींद्रमध्ये वैमनस्य निर्माण झाले होते. रवींद्र हा अधूनमधून त्यांना शिवीगाळ करायचा. घटनेच्या दिवशी रवींद्र हा दीपक नेवारे याच्यासोबत मोटरसायकलने जात असताना रवींद्रने त्याला जुनघरेच्या दुकानासमोर थांबविले होते. तो दुकानात सामान खरेदी करण्यासाठी गेला असता त्याला नकार देण्यात आला होता. त्यामुळे भांडण झाले होते. सुरेंद्रने वसंता जुनघरे याच्या कपाळावर दगड मारून रक्तबंबाळ केले होते. त्यामुळे दिनेश आणि मंगेश यांनी सुरेंद्रला बांधून क्रिकेट स्टम्पने मारहाण केली होती. त्यावेळी अचानक पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी जुनघरे पितापुत्र आणि रवींद्रला पोलीस ठाण्यात नेले होते. जखमी सुरेंद्र आणि वसंताला प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले होते. येथील वैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्ल्यावरून सुरेंद्रला मेडिकल कॉलेज इस्पितळाकडे नेले जात असताना त्याचा मृत्यू झाला होता. दरम्यान सुरेंद्रचा मृत्यू पोलीस कोठडीत झाल्याच्या बातमीने तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे हे प्रकरण सीआयडीकडे वर्ग झाले होते. उपअधीक्षक जी. बी. यादव यांनी तपास केला असता जुनघरे पितापुत्र दोषी आढळले होते. त्यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल होऊन न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. न्यायालयात एकूण १६ साक्षीदार तपासण्यात आले. गुन्हा सिद्ध होऊन न्यायालयाने आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. न्यायालयात सरकारच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील राम अनवाणे, आरोपींच्यावतीने अॅड. संजय करमरकर यांनी काम पाहिले. उपनिरीक्षक आर. डी. ठाकूर, सीआयडीचे हेड कॉन्स्टेबल दीपक तिवारी, नायक पोलीस काशिनाथ कुमरे यांनी न्यायालयीन कामात सहकार्य केले. (प्रतिनिधी)
वडिलांसह दोन मुलांना जन्मठेप
By admin | Updated: August 8, 2014 01:11 IST