लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्र शासनाने पीक विमा ऐच्छिक केला असला तरी विमा कंपन्या पिकांचे किडींमुळे नुकसान हाेऊनही परतावा देण्यास नकार देतात. त्यामुळे शेतकरी पिकांचा विमा काढण्यास फारसे उत्सुक नाहीत. खरीप हंगामात जिल्ह्यात १५,९२७ शेतकऱ्यांनी विविध पिकांचा विमा काढला हाेता. बहुतेकांची पिके किडी व बुरशीजन्य राेगांमुळे नष्ट झालीत. मात्र, विमा कंपनीने हे नुकसान किडी अथवा राेगांमुळे झाले नसून, ते धुक्यामुळे झाल्याचा दावा करीत शेतकऱ्यांना विम्याचा परतावा देण्यास नकार दिला. त्यामुळे रबी हंगामात पीक विमा काढणाऱ्यांची संख्या ही ५,२९३ वर आली.
जिल्ह्यात पीक विम्यासाठी रिलायन्स जनरल इन्शुरन्स लिमी. कंपनीला नियुक्त केले आहे. खरीप हंगामात साेयाबीनचे येल्लाे माेझॅक, किडी व इतर बुरशीजन्य राेग, कपाशीचे गुलाबी बाेंडअळी, बाेंडसड व काही बुरशीजन्य राेग, धानाचे तपकिरी तुडतुडे तसेच तुरीची पाने व शेंगा खाणाऱ्या अळींमुळे प्रचंड नुकसान झाले. कृषी अधिकाऱ्यांच्या सर्वेक्षणानंतर शेतकऱ्यांनी विमा कंपनीला या नुकसानाबाबत कळविले. ही पिके किडीं व राेगांच्या प्रादुर्भावामुळे नष्ट झाल्याचा अहवाल कृषी अधिकाऱ्यांनी दिला. परंतु, हे नुकसान किडी अथवा राेगांमुळे झाले नसून, ते धुक्यामुळे झाल्याचे विमा कंपनीने शेतकऱ्यांना कळविले आहे. विमा कंपनीने साेयाबीनच्या विम्यापाेटी शेतकऱ्यांकडून ३७८ रुपये घेण्यात आले हाेते. यात केंद्र व राज्य शासनाचा वाटा अनुक्रमे ३,०२४ रुपयांचा हाेता. गव्हासाठी ही रक्कम अनुक्रमे ५७० रुपये व १,९९५ रुपये तर हरभऱ्यासाठी ती ५२५ रुपये व १,८३७.५० रुपये एवढी आहे. पैसे भरूनही विमा कंपनी नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करीत असेल, न्याय मागण्यासाठी न्यायालय अथवा ग्राहक मंचकडे जावे लागत असेल तर आपण पीक विमा काढायचा कशासाठी, असा प्रश्नही शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
---
शेतकऱ्याची प्रतिक्रिया
मी खरीप हंगामात साेयाबीनचा विमा भरला हाेता. येल्लाे माेझॅक व किडींमुळे पीक पूर्णपणे नष्ट झाल्याने कंपनीला कळविले. हे नुकसान धुक्यामुळे झाल्याचा दावा कंपनीने केला. कृषी अधिकारी व इतरांच्या मते किडींमुळे पीक नष्ट झाले. त्यामुळे रबी पिकाचा विमा भरला नाही.
- दिलीप हिवरकर, जलालखेडा.
--
खरीप नुकसानीचे अनुदान
नागपूर जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये २,१२,११० हेक्टरमध्ये कपाशीची लागवड तर १,०२,३८७ हेक्टरमध्ये साेयाबीनची पेरणी करण्यात आली हाेती. सततचा पाऊस, जमिनीत पाण्याचा न झालेला निचरा, प्रतिकूल हवामानामुळे जिल्ह्यात कपाशीचे ९१ टक्के तर साेयाबीनच्या पिकाचे ९४ टक्के नुकसान झाले. या नुकसानीचे सर्वेक्षण करण्यात आले असले तरी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने अद्यापही नुकसान भरपाई दिली नाही. शिवाय, पीक विमा कंपनीने परतावा नाकारला आहे.