बहिणीचा कारनामा : बडनेरा पोलीस ठाण्यात तक्रारअमरावती : येथील अकोली वळण मार्गालगतची जमीन हडपण्यासाठी चक्क बहिणीनेच भंडारा जिल्ह्यातील लाखनी येथून बनावट मुखत्यारपत्र तयार केल्याची बाब उघडकीस आली आहे. याप्रकरणी बडनेरा पोलीस ठाण्यात बहिणीविरुद्ध दोन भावांनी तक्रार नोंदविली आहे. बडनेरा येथील रहिवासी रामदास व गणेश कातोरे या दोन भावांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या नावाची बनावट कागदपत्रे सादर करुन त्यांची बहीण शकुंतला रंगराव सपाटे यांनी १२ आॅक्टोबर २०१२ रोजी मुखत्यारपत्र तयार केले. कातोरे बंधू बडनेरा येथील रहिवासी असताना त्यांना भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील मौजा लाखोरी येथील रहिवासी दाखविण्यात आले आहे. भूमापन क्र.२८२/२, भोगवटदार वर्ग-१, आकारणी १९.३३ पैकी गणेश कातोरे व रामदास कातोरे यांच्या नावे प्रत्येकी ०.८१ हे.आर.जमीन आहे. दोन्ही भाऊ उद्योग-व्यवसायात व्यस्त राहात असल्याने शेतीविषयक कामकाज सांभाळू शकत नसल्याचे कारण पुढे करुन त्यांची सख्खी बहीण शकुंतला सपाटे(कातोरे) यांना खास मुखत्यार नेमत असल्याची बनावट कागदपत्रे तयार करण्यात आली.या जमिनीच्या कोणत्याही भागाच्या विक्रीचे, करारावर देण्याचे, सर्वाधिकार मुखत्यारपत्राव्दारे शकुंतला सपाटे यांना बहाल करण्यात आले होते. मात्र मुखत्यारपत्र तयार करताना गणेश व रामदास कातोरे यांच्या नावाची बनावट व्यक्ती उभी करून बनावट कागदपत्रेही सादर करण्यात आली. लाखनी येथील दुय्यम निबंधक कार्यालयातून बनावट मुखत्यारपत्र तयार केल्याची तक्रार पोलिसांत करण्यात आली आहे. हे बनावट मुखत्यारपत्र तयार करताना बनावट निवडणूक ओळखपत्र, व बनावट प्रतिज्ञापत्रदेखील जोडल्याचे कातोरे बंधुंनी तक्रारीत म्हटले आहे. साक्षीदार म्हणून भरत उरकुडे, पे्रमसागर उरकुडे यांची नावे आहेत. एकाच नावाच्या व्यक्ती बडनेरा आणि लाखनी येथे वास्तव्यास कशा असूू शकतात, हा प्रश्नही तक्रारीतून उपस्थित करण्यात आला आहे. एकीकडे शासकीय दस्तावेजांचे सर्व व्यवहार संगणक प्रणालीने होत असताना बनावट कागदपत्रे तयार करणारी टोळी सुध्दा सक्रिय झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. आहे. शेती हडपण्यासाठी बहिणीने हा प्रकार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी बनावट कागदपत्रे तयार करणे व खोटी व्यक्ती उपस्थित करुन फसवणूक केल्याप्रकरणी सखोल चौकशी करुन संबंधितांवर फौजदारी दाखल करावी, अशी मागणी कातोरे बंधुंनी केली आहे. (प्रतिनिधी)
जमीन हडपण्यासाठी लाखनीतून निघाले बनावट मुखत्यारपत्र
By admin | Updated: July 17, 2014 00:59 IST