- मनोहर म्हैसाळकर सलग तिसऱ्यांदा अध्यक्षपदी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वैदर्भीय साहित्यिकांची पालक संस्था म्हणून परिचित असलेल्या विदर्भ साहित्य संघाची नवी कार्यकारिणी ठरल्यानुसार बिनविरोध आली आहे. अध्यक्षपदासाठी सतीश तराळ यांनी माघार घेतल्याने मनोहर म्हैसाळकर यांची सलग तिसऱ्यांदा अध्यक्षपदी निवड झाली आहे.
२०२३ मध्ये विदर्भ साहित्य संघाला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर यंदाच्या पंचवार्षिक निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. कार्यकारिणीत बसण्याची अनेकांची इच्छा होती. मात्र, म्हैसाळकरांनी आपल्या मुत्सद्देगिरीने निवडणुकीत होणारी रस्सीखेच रोखण्यात यश संपादन केले. एक अध्यक्ष आणि २२ सदस्य अशी ही कार्यकारिणी असते. मात्र, निवडणुकीत केवळ २२ उमेदवारांनीच अर्ज भरल्याने, अध्यक्ष वगळता कार्यकारिणीची निवडणूक होणार नाही हे निश्चित होते. मात्र, अध्यक्षपदासाठी मनोहर म्हैसाळकरांसोबतच सतीश तराळ यांनीही अर्ज भरल्याने निवडणुकीचा ताण संपणार नाही, अशी शक्यता होती. मात्र, ऐन अखेरच्या दिवशी तराळ यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि निवडणुकीची पुढील कार्यवाही स्थगित झाली. मंगळवारी नव्या कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांची घोषणा होण्याची शक्यता आहे.
............