शहरं
Join us  
Trending Stories
1
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
2
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
3
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
4
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
5
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
6
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
7
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
8
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
9
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
10
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
11
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
12
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
13
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
14
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
15
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
16
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
17
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
18
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
19
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
20
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी

अवयवदानाचे मोल प्रत्येकाने ओळखावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:12 IST

- तज्ज्ञांचा सूर : अवयवदानाची मोहीम तळागाळापर्यंत पोहचण्याची गरज सुमेध वाघमारे नागपूर : अवयवदानाने एखाद्याला नवीन आयुष्य मिळू शकते, ...

- तज्ज्ञांचा सूर : अवयवदानाची मोहीम तळागाळापर्यंत पोहचण्याची गरज

सुमेध वाघमारे

नागपूर : अवयवदानाने एखाद्याला नवीन आयुष्य मिळू शकते, थांबलेले जगणे सुरू होऊ शकते. एक मृतदेह ११ जणांना जीवनदान देतो, तर ३५ लोकांच्या आयुष्याचा दर्जा सुधारण्यास मदत करतो. परंतु योग्य प्रमाणात अवयवदान होत नसल्याने आजही कित्येक रुग्ण अवयवाच्या प्रतीक्षेत मृत्यूशी लढा देत आहेत. यामुळे वैद्यकीय, शासन व सर्वसामान्य जनता अशा तिन्ही पातळ्यांवर मोठ्या प्रमाणावर जनजागृती घडवून आणणे गरजेचे आहे, असे मत शहरातील विविध अवयवांचे प्रत्यारोपण तज्ज्ञ व डॉक्टरांनी मांडले.

अवयवांच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांची संख्या पाहता, ‘मरावे परि अवयवरूपी उरावे’, अशी नवी म्हण पुढे येत आहे. उपराजधानीतील गेल्या सात वर्षांत टप्प्याटप्प्याने अवयवदानाचा आकडा वाढत आहे. परंतु अवयवदानाचे प्रमाण आजही अपेक्षेपेक्षा कमी आहे. यामागे राहण्याची नेमकी कारणे कोणती? आजही समाजात याबाबत गैरसमज आहेत का? अवयवदानाच्या जनजागृतीकरिता शासन कमी पडते का? अवयवदानाची मोहीम तळागाळापर्यंत पोहचण्याकरिता काय करणे गरजेचे आहे? श्रीलंकेत मानवी अवयव ही राष्ट्रीय संपत्ती म्हणून ग्राह्य धरली जाते, त्याच धर्तीवर भारतात असा कायदा करणे गरजेचे आहे का? अशा अनेक प्रश्नांवर डॉक्टरांनी चर्चा केली.

- ०.५ टक्केही अवयवदान होत नाही - डॉ. देवतळे ()

‘आयएमए’ अध्यक्ष डॉ. संजय देवतळे म्हणाले, लोकसंख्येच्या तुलनेत भारतात ०.५ टक्केही अवयवदान होत नाही. भारतीय संस्कृतीला अंधश्रद्धा नामक अविचारी भावनेने ग्रासून टाकले आहे. अवयवदान हे श्रेष्ठ दान असले तरी लोकांना फारशी कल्पना नसल्याचे जाणवते. कदाचित याच कारणास्तव अवयवदानाला हवा तसा प्रतिसाद जनसामान्यातून मिळत नाही. नागपुरात ‘एम्स’, दोन वैद्यकीय शिक्षण महाविद्यालय व ७०० वर छोटी व मोठी रुग्णालये आहेत. यामुळे उपराजधानीचे हे शहर ‘मेडिकल हब’ सोबतच ‘ऑर्गन डोनेशन सिटी’ म्हणून ओळख व्हावी, यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यायला हवा.

- यकृताच्या प्रत्यारोपणासाठी ‘लिव्हिंग डोनर’ गरजेचे - डॉ. सक्सेना ()

यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. राहुल सक्सेना म्हणाले, मधुमेह, रक्तदाब व कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण नसल्यास यकृत (लिव्हर) निकामी होण्याचे प्रमाण हल्ली वाढत आहे. लठ्ठपणामुळे होणारे ‘फॅटी लिव्हर’ हेही एक कारण यकृत निकामी होण्यास कारणीभूत ठरत आहे. शंभर जणामध्ये प्रत्येक तिसरा व्यक्ती ‘लिव्हर सिरोसिस’ या आजाराने बाधित आहे. परिणामी, भारतात ‘लिव्हर कॅन्सर’ मृत्यूचे पाचवे कारण ठरले आहे. यकृत हे जिवंतपणी (लिव्हिंग डोनर) व मेंदूमृत व्यक्तीकडून (कॅडेव्हेरिक डोनर) घेता येते. ‘लिव्हिंग डोनर’मध्ये यकृताच्या उजव्या भागातील ५० ते ६० टक्केच भाग घेतला जातो. दात्याचे यकृत सात ते आठ आठवड्यात पुन्हा ‘रिजनरेट’ होते. तर मेंदूमृत व्यक्तीकडून पूर्ण यकृत घेतले जाते. वाढते रुग्ण पाहता ‘लिव्हिंग डोनर’ वाढणे गरजेचे आहे.

- त्वचादानाबाबत फारशी जागृती नाही - डॉ. जहागीरदार ()

प्लास्टिक सर्जन डॉ. समीर जहागीरदार म्हणाले, त्वचा प्रत्यारोपणातून (होमोग्राफ्टिंग) गंभीर स्वरूपाच्या जळीत रुग्णांना वाचविणे शक्य आहे. परंतु, समाजात त्वचादानाबाबत फारशी जागृती नाही. त्यातुलनेत मेंदूपेशी मृत रुग्णांचे अवयवदान वाढले आहे. अन्य अवयवाप्रमाणे त्वचादानाबाबतीत मृताचे नातेवाईक फारसे तयार नसतात. काही गैरसमज असल्याने ते त्वचादानासाठी पुढाकार घेत नाहीत. विशेष म्हणजे, त्वचादानामुळे विद्रुपपणा येत नाही. त्वचेच्या वरचे केवळ दोनच स्तर काढले जातात. नागपुरात आतापर्यंत केवळ ४५ मृताकडून त्वचा दान झाले आहे. त्वचादानाबाबत जनजागृती वाढविणे गरजेचे आहे.

- मूत्रपिंड दानाचे महत्त्व ओळखावे - डॉ. साल्पेकर ()

मूत्रपिंड रोग तज्ज्ञ डॉ. सुहास साल्पेकर म्हणाले, जगात दरवर्षी मूत्रपिंडाचे (किडनी) १५ लाखांवर नवे रुग्ण आढळून येतात. भारतात याचे प्रमाण दोन ते तीन लाख आहे. नागपूरचा जर विचार केला तर दिवसभरात एक नवा रुग्ण आढळून येतो. मधुमेहामुळे १०० मधून ३३ रुग्णांना मूत्रपिंडाचा आजार होतो. मागील काही वर्षांमध्ये मूत्रपिंड निकामी होण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी, इतर अवयवांच्या तुलनेत मूत्रपिंडाची मागणी मोठी आहे. सध्याच्या स्थितीत भारतात अडीच लाख रुग्णांना मूत्रपिंडाची गरज आहे. ‘लिव्हिंग डोनर’ व ‘कॅडेव्हेरिक डोनर’ या दोन्हीकडून मूत्रपिंड मिळू शकते. परंतु जिथे नातेवाईक तयार नसतात किंवा टिश्यू जुळत नाही तिथे रुग्ण अडचणीत येतो. त्याला ब्रेन डेड’ रुग्णाची गरज भासते. परंतु प्रतीक्षेची यादी मोठी असल्याने रुग्णाला महिनोनमहिने वाट पाहण्याची जीवघेणी वेळ येत आहे. हे थांबविण्यासाठी अवयवदानाला महत्त्व देणे आवश्यक आहे.

- अंधत्व दूर करण्यासाठी कठोर पावले उचलणे आवश्यक - डॉ. अळसी ()

नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. पल्लवी अळसी म्हणाल्या, श्रीलंकेत मानवी अवयव ही राष्ट्रीय संपत्ती म्हणून ग्राह्य धरली जाते, त्याच धर्तीवर भारतात असा कायदा करणे गरजेचे आहे. यामुळे अनेक लोकांचे अंधत्व दूर करणे शक्य आहे. भारतात अंधश्रद्धा, गैरसमज व इच्छा असतानाही नेत्रदानाची माहिती नसल्याने नेत्रदानाला गती आलेली नाही. जगात ४ कोटी ५० लाख लोक अंध आहेत. यामध्ये १ कोटी ५० लाख रुग्ण एकट्या भारतात आहेत. यातील ६० लाख रुग्णांना बुबुळाचे अंधत्व आहे. यात दरवर्षी ३० हजार रुग्णांची भर पडते. यामुळे अंधत्वाचे प्रमाण कमी होण्यापेक्षा वाढत आहे. सरकारने यात लक्ष घालून कठोर निर्णय घेणे गरजेचे आहे.

- अवयवदानासाठी जनसामान्यांनीच पुढे यावे - डॉ. खंडाईत ()

आयएमएच्या माजी अध्यक्ष व अवयवदानासाठी पुढाकार घेतलेल्या डॉ. वैशाली खंडाईत म्हणाल्या, ज्या संस्कृतीत दानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे, त्या भारतीय संस्कृतीला अंधश्रद्धा नामक अविचारी भावनेने ग्रासून टाकले आहे. अवयवदान हे श्रेष्ठ दान असले तरी लोकांना फारशी कल्पना नसल्याचे जाणवते. अवयवदानाचे प्रमाण अपेक्षेपेक्षा कमी राहण्यामागे सरकारी यंत्रणेचा कमी पुढाकार हे मुख्य कारण आहे. यामुळे जनसामान्यांनीच पुढे यावे, घरातील मृत माणसाचे अवयव दान करून समाजात एक नवा आदर्श निर्माण करावा, असे आवाहनही त्यांनी केले.