शरद काळे : गृहशास्त्र विभागातर्फे राष्ट्रीय परिषदेचे आयोजननागपूर : नागरी वस्त्यांमध्ये कचऱ्याची समस्या वाढत चालली आहे. कायदा आणि तंत्रज्ञान यांच्या मदतीने ही समस्या सुटेलच असे नाही. याकरिता नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेतला पाहिजे. सर्वांनी पर्यावरणाचे सेवक होण्याची आवश्यकता असल्याचे मत भाभा आॅटोमिक रिसर्च सेंटरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. शरद काळे यांनी व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या गृहशास्त्र विभागातर्फे ‘मॅनेजमेंट आॅफ बायोडिग्रेडेबल वेस्ट अँण्ड न्युट्रीशनल स्ट्रॅटेजिस’ या विषयावरील राष्ट्रीय परिषदेचे वनामती येथील सभागृहात आयोजन करण्यात आले होते. यावेळी बीजभाषणादरम्यान ते बोलत होते.वनामती येथे आयोजित या कार्यक्रमाला विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे, नागपूरच्या राष्ट्रीय लिंबूवर्गीय फळ अनुसंधान केंद्राचे संचालक डॉ. लदानिया, गृहशास्त्र विभागाच्या अधिष्ठाता डॉ. माधुरी नासरे, विभाग प्रमुख डॉ. कल्पना जाधव हे प्रामुख्याने उपस्थित होते. आपली संस्कृती आणि निसर्गाने आपल्याला बऱ्याच गोष्टींची शिकवण दिली आहे. परंतु हव्यासापोटी मनुष्य आपली जबाबदारी विसरत चालला आहे. कचऱ्याच्या समस्येवर विजय मिळविण्यासाठी नागरिकांचा पुढाकार हेच सर्वात मोठे पाऊल राहणार आहे. निसर्गामुळे सर्वांचे अस्तित्व आहे, त्यामुळे त्याचा आदर हा व्हायलाच हवा, असे डॉ. काळे म्हणाले. डॉ. लदानिया यांनी ‘वेस्ट इज बेस्ट’चा वापर शेतीसाठी कसा करता येईल यावर मार्गदर्शन केले. अन्न फेकून वाया घालविण्याची प्रवृत्ती वाढत चालली आहे. यातूनदेखील इंधननिर्मिती करता येणे शक्य आहे, असे ते म्हणाले. यावेळी कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे यांनीही मार्गदर्शन केले. मागणीनुसार तंत्रज्ञानात आविष्कार तर व्हायलाच हवा. परंतु निसर्गाचादेखील विचार होणे आवश्यक आहे यावर त्यांनी भर दिला. विभाग प्रमुख डॉ. कल्पना जाधव यांनी प्रास्ताविकातून चर्चासत्राची रूपरेषा विशद केली. डॉ. जांभुळकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाला अनेक महाविद्यालयातून आलेले प्रतिनिधी, संशोधन करणारे विद्यार्थी व मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)विकेंद्रीकरण करून कचऱ्याची विल्हेवाट लावावाढत्या शहरीकरणासोबतच कचऱ्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. शहरातून दररोज निर्माण होणाऱ्या शेकडो टन कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची हा प्रश्न महानगरपालिकांसमोर असतो. परंतु जर योग्य पद्धतीने विकेंद्रीकरण केले तर कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावता येणे सहज शक्य आहे असे डॉ.शरद काळे म्हणाले. सामान्यत: शहरांमध्ये सर्व कचरा एकत्रित करून त्याची विल्हेवाट लावण्यात येते. परंतु जैव कचरा वेगळा काढून जर नियोजन केले तर ५० टक्के कचरा कमी करता येणे शक्य आहे.जैतापूर प्रकल्पाला विरोध नकोजैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध व्हायला नको, असे मत डॉ. काळे यांनी व्यक्त केले. भविष्यात ऊर्जेची मागणी वाढणार आहे. त्यामुळे अणुऊर्जा ही फार महत्त्वाची ठरणार आहे. विद्युतनिर्मिती, वैद्यकीय क्षेत्र यात अणुऊर्जेचा मोठा उपयोग होतो. जैतापूरला अणुऊर्जा प्रकल्प उभा राहिला तर त्याचा फायदाच होणार आहे, असे ते म्हणाले.
सर्वांनी पर्यावरणाचे सेवक व्हावे
By admin | Updated: January 18, 2015 00:54 IST