प्रफुल्ल लुंगे - सेलू (वर्धा)
बोरधरण परिसरातील राममंदिरजवळ दिसणार्या वयस्क पट्टेदार वाघाची हत्या झाल्याच्या संशय आता गडद झाला आहे़ ‘त्या’ वाघाची माहिती देणार्या अधिकार्यात एकसूत्रतेचा अभाव असून जबाबदार अधिकारी कानावर हात ठेवत असल्याने हा वाघ गेला कुठे, याचा तपास आता वरिष्ठ पातळीवरून करण्याची गरज निर्माण झाली आहे. बुधवारी बोर अभयारण्यात ४९ पाणवठ्यांवर ४९ मचाणी उभारल्या गेल्या. सर्व ठिकाणी शासकीय कर्मचार्यांसह एक एनजीओ सदस्य सोबतीला होता. हलकी पावसाची सर आली; पण प्रगणनेसाठी मचाणीवर चढलेले कर्मचारी खाली उतरले नसल्याचे सांगण्यात आले़ दररोज दिसणारा वाघ प्राणी गणनेमध्ये दिसेल, असे वाटत होते; पण एकही वाघ मचाणीवर चढलेल्यांना दिसला नाही, अशी विश्वसनिय माहिती आहे. या प्रगणनेत कुणी चार तर कुणी पाच वाघ, दोन बिबट दिसल्याचे सांगतात; पण वास्तव वेगळेच आहे. अद्याप त्या वाघाचा ठावठिकाणा अधिकार्यांना लागला नाही. बोर अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र गायनेर यांच्या भ्रमणध्वनीवर वारंवार संपर्क करूनही ते उत्तर देण्याचे सौजन्य दाखवित नाही़ जुन्या बोर अभयारण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे; पण त्यांना जंगलातील एकूण वाघांची संख्येची प्राथमिक माहितीही नाही. बेपत्ता वाघाचे प्रकरण शेकू नये म्हणून न आढळलेल्या वाघांच्या संख्येचे आकडे घालून माहिती पुरविण्याची तयारीही बोर अभयारण्य प्रशासनाने चालविली आहे़