नागपूर : मागील काही महिन्यांपासून रखडलेली शिक्षकांची समायोजन प्रक्रिया पूर्ण करून शिक्षक संख्येचा समतोल साधण्याचा प्रयत्न शिक्षण विभागाकडून करण्यात आला. परंतु समायोजनानंतरही जिल्ह्यात शिक्षकांची ३०० पेक्षा अधिक पदे रिक्त असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे समायोजनानंतरही जिल्ह्यात शिक्षक संख्येचे गणित बिघडलेलेच आहे असेच म्हणावे लागेल. त्यामुळे नवीन शिक्षक भरती झाल्याशिवाय विद्यार्थ्यांना पूर्णवेळ शिक्षक मिळणे शक्य नाही.
ग्राम विकास विभागाच्या शासन निर्णयानुसार दरवर्षी ३० सप्टेंबर संदर्भदिन पकडून ३१ ऑक्टोबरपूर्वी शिक्षकांची समायोजन प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे. परंतु मागील काही वर्षांपासून ही प्रक्रिया ठरावीक वेळेत पूर्ण होत नाही. २०२०-२१ ची समायोजन प्रक्रिया नुकतीच पार पडली. परंतु वाढलेली पटसंख्या, मागील काही वर्षात सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांची संख्या व अनेक वर्षापासून बंद असलेली शिक्षक भरती यामुळे शिक्षक संख्येचा ताळमेळ जुळवणे कठीण झाले आहे. त्यामुळे समायोजन प्रक्रिया पूर्ण होऊनही संपूर्ण जिल्ह्यात ३०० पेक्षा अधिक जागा रिक्त राहिल्या आहेत. सोबतच केंद्र प्रमुखांची १०१ पदे सुद्धा रिक्त आहेत.
- रिक्त पदे
सहा. शिक्षक मराठी माध्यम - २०५
सहा. शिक्षक हिंदी माध्यम - ३
- विषय पदवीधर शिक्षक
भाषा - ९५
विज्ञान - १२
समाजशास्त्र - १८
इतर - १२५
- अनेक शाळांमध्ये विषय शिक्षकच नाहीत
बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार इयत्ता ६ ते ८ च्या विद्यार्थ्यांकरिता विषय निहाय प्रशिक्षित पदवीधर शिक्षकांची नेमणूक करणे आवश्यक आहे. परंतु, सहायक शिक्षकांमध्ये प्रशिक्षित पदवीधर शिक्षक उपलब्ध असूनही फेब्रुवारी २०१८ पासून जिल्हा परिषद प्रशासनाकडून पदोन्नतीची प्रक्रिया पार न पडल्यामुळे विषय शिक्षकांची १२५ पदे रिक्त आहेत. त्यामुळे अनेक शाळांमध्ये इयत्ता ६ ते ८ करिता एकही विषय पदवीधर शिक्षक नसल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे जवळपास दीडशे शाळांमध्ये केवळ एकच शिक्षक आहे
- केंद्रप्रमुखांच्या पदांचा प्रभार शिक्षकांकडेच
केंद्रप्रमुखांच्या रिक्त असलेल्या १०१ पदांचा प्रभार सुद्धा शिक्षकांकडेच आहे. त्यामुळे हे शिक्षक सुद्धा पूर्णवेळ अध्यापन कार्य करू शकत नाहीत.
- २००७ पासून शिक्षकांची नवीन भरती प्रक्रियाच झाली नाही. तर ३ वर्षांपासून जिल्हा परिषद प्रशासनाकडून विषय पदवीधर शिक्षक पदाकरिता पदोन्नतीची प्रक्रिया राबविण्यात आली नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सहाय्यक शिक्षक व विषय पदवीधर शिक्षकांची पदे रिक्त आहेत. या दोन्ही प्रक्रियेकरिता राज्य शासन व जिल्हा परिषद प्रशासन दोन्ही स्तरावर संघटनेकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. विद्यार्थी हित लक्षात घेता शासनाने त्वरित नवीन शिक्षक भरती करावी तसेच जिल्हा परिषद प्रशासनाकडून विषय पदवीधर शिक्षक पदोन्नतीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी.
लीलाधर ठाकरे, जिल्हाध्यक्ष,
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती
- शिक्षण विभाग प्राथमिकमध्ये नुकतीच शिक्षक समायोजन प्रक्रिया पार पडली. परंतु अजूनही अनेक सहाय्यक शिक्षक आणि विषय शिक्षकाच्या जागा रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तेव्हा शासनाने तातडीने शिक्षक भरती करावी.
प्रमोद लोन्हारे, विदर्भ विभागीय समन्वयक,
महाराष्ट्र राज्य पदवीधर, प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभा