जितेंद्र ढवळे
सरपंचपदाचे आरक्षण जाहीर : ११ फेब्रुवारीला निवडणूक
नागपूर : ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर सरपंच आरक्षण सोडतीकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. नागपूर जिल्ह्यात १ ते ४ फेब्रुवारी दरम्यान तेराही तालुक्यात आरक्षण सोडत काढण्यात आली. यात १५ जानेवारी निवडणुका झालेल्या पाच गावात नव्या आरक्षणानुसार निवडून आलेला एकही सदस्य नसल्याने सरपंच पदाचा पेच निर्माण झाला आहे. यात रामटेक तालुक्यातील दाहोदा, सावनेर तालुक्यातील नांदोर, जैतपूर आणि सोनपूर तर कळमेश्वर तालुक्यातील सावंगी तोमर या ग्रा.पं.चा समावेश आहे.
लॉकडाऊनमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या जिल्ह्यातील १३० ग्रामपंचायतीच्या निवडणुका आयोगाने डिसेंबर महिन्यात जाहीर केल्या. मतदार यादीतील घोळामुळे कुही तालुक्यातील देवळी (कला) ग्रा.पं.ची निवडणूक रद्द करण्यात आली. जिल्ह्यात १२९ ग्रामंपचायतींची निवडणूक १५ जानेवारी रोजी झाली. यात सावनेर तालुक्यातील जटामखोरा तर कळमेश्वर तालुक्यातील सोनपूर (आदासा) ग्रा.पं.ची निवडणूक बिनविरोध झाली. या १२९ ग्रा.पं.मध्ये विविध वॉर्डातून ११७४ सदस्य विजयी झाले. यात ६६९ महिला सदस्यांचा समावेश आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीने १०२ ग्रा.पं.वर तर भाजपाने ७३ ग्रा.पं.वर दावा सांगितला आहे. त्यामुळे सरपंच आरक्षण सोडतीकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या होत्या. जिल्ह्यात १२९ ग्रा.पं.मध्ये ११ फेब्रुवारी रोजी सरपंच पदासाठी निवडणूक होईल. यात कुणाचे किती सरपंच विजयी होतात, हेही स्पष्ट होईल.
या गावामध्ये पेच
- कळमेश्वर तालुक्यात ५ ग्रा.पं.ची निवडणूक झाली. यात सोनपूर (आदासा) ग्रा.पं.ची निवडणूक बिनविरोध झाली. सावंगी (तोमर) येथे अनुसूचित जमाती (महिला) साठी सरपंचपद आरक्षित असले तरी, निवडून आलेल्या ९ सदस्यात या प्रवर्गाचा उमेदवारच नाही. यामुळे येथे उपसरपंच पदासाठी घोडेबाजार होणार आहे.
- सावनेर तालुक्यात १२ ग्रा.पं.साठी निवडणुका झाल्या. यात जटामखोरा ग्रा.पं.ची निवडणूक बिनविरोध झाली आहे. मात्र नव्या आरक्षण सोडतीनुसार नांदोरी ग्रामपंचायतचे सरपंचपद अनुसूचित जमाती, जैतपूर ग्रामपंचायत अनुसूचित जाती आणि सोनपूर ग्रामपंचायत अनुसूचित जातीसाठी राखीव झाले आहे. या तिन्ही ग्रामपंचायतींमध्ये उपरोक्त आरक्षणाचा एकही सदस्य नाही.
- रामटेक तालुक्यात ९ ग्रा.पं.च्या निवडणुका झाल्या. यात दाहोदा ग्रामपंचायतमध्ये सरपंचपदासाठी आरक्षण अनु.जाती महिलासाठी निश्चित करण्यात आले. पण या ग्रामपंचायतमध्ये अनु.जाती महिला
संवर्गातील जागा कोणत्याही वॉर्डात राखीव नव्हती. यासोबतच निवडणुकीत अनु.जाती महिला संवर्गातील उमेदवार एकाही वॉर्डातून निवडून आलेला नाही. त्यामुळे दाहोदा गावाला काही काळासाठी सरपंचपदासाठी वाट पाहावी लागेल.
पुढे काय होणार
नव्या आरक्षण सोडतीनुसार ज्या गावात सरपंच पदासाठी उमेदवार नसेल तिथे उपसरपंच पदाकडे सरपंच पदाचा प्रभार सोपविण्यात येईल. याबाबत रामटेकचे तहसीलदार बाळासाहेब मस्के म्हणाले, दाहोदा ग्रामपंचायतमध्ये उपसरपंच पदाची निवडणूक होईल. सरपंचपदासाठी कार्यवाही करण्यात येईल. पण येथे कुणीही महिला सदस्य अनु.जातीची नसल्याचे एकही उमेदवार रिंगणात राहणार नाही. उपसरपंच निवडणूक जाहीर करून येथे सरपंचपदाचा कारभार उपसरपंचाकडे सोपविण्यात येईल. प्रशासकपद संपुष्टात येईल.
बहुमत नसताना लॉटरी
नरखेड तालुक्यात राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या जलालखेडा ग्रा.पं.मध्ये सत्ताधारी जलालखेडा सुधार समितीला मतदारांना नाकारले आहे. सुधार समितीला ४ तर जनक्रांती पॅनलला ९ जागा मिळाल्या आहे. मात्र आरक्षण सोडतीनुसार येथील सरपंच पद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे. यात १३ सदस्यांपैकी केवळ जलालखेडा सुधार समितीचे कैलास जगन निकोसे उपरोक्त संवर्गातील एकमेव सदस्य आहे. त्यामुळे त्यांच्या पॅनलला बहुमत नसले तरी सरपंचपद नक्कीच मिळणार आहे.
निवडणुका झालेल्या ग्रामपंचायती - १२९
निवडून आलेले सदस्य : ११७४