धापेवाडा : विदर्भाचे पंढरपूर धापेवाडा येथे २ व ३ डिसेंबरला होणारी रथयात्रा व मंडई कोरोनामुळे अखेर स्थगित करण्यात आली आहे. परिसरातील ही सर्वांत मोठी मंडई असून कार्तिक पौर्णिमेच्या द्वितीया व तृतीयेला येथे विशाल रथाचे गावभर भ्रमण करण्यात येते. या रथयात्रेचे हे ११५ वे वर्ष असून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रथयात्रा रद्द होण्याचे संकेत जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आले आहेत. कोरोनाच्या संसर्गाला प्रतिबंध घालण्यासाठी सर्व पूजाविधी मंदिराच्या आतच करण्याचे उपजिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे. दरवर्षी कार्तिक पौर्णिमेला श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात काकड आरतीची समाप्ती होते. पंधरा दिवस विविध प्रकारचे कार्यक्रम पार पडल्यानंतर पौर्णिमेच्या तिसऱ्या दिवशीपासून मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होते. पौर्णिमेच्या तृतीयेला येथे मोठी यात्रा भरते. कार्तिक पौर्णिमेनिमित्त धापेवाड्यात मंडईचे आयोजन करण्यात येते. त्यात भव्य खंजिरी भजन स्पर्धा, खडी गंमत, लावण्या, कीर्तन, कव्वाली इत्यादी कार्यक्रमांचा समावेश असतो. हे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
----------
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धापेवाडा येथील रथयात्रा रद्द होणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. ३० नोव्हेंबरला त्यासंबंधीच्या कार्यवाहीसाठी बोलाविण्यात आले आहे. तसेच मंदिर प्रशासनाकडून सॅनिटायझर फवारणी व इतर खबरदारी घेण्यात येत आहे.
आदित्यप्रतापसिंह पवार, सचिव, श्री विठ्ठल-रुक्मिणी देवस्थान, धापेवाडा