पत्नीने केली पोलिसांकडे तक्रार
नागपूर : तोंडावरच्या फोडाची शस्त्रक्रिया करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे आपला जीव गमवावा लागला. ध्यानीमनी नसताना घरचा कर्ता जीव गमावल्यामुळे मृत व्यक्तीचा परिवार झटक्यात निराधार झाला आहे. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही संतापजनक घटना आहे. किशोर भास्करराव गावंडे (वय ४६) असे मृताचे नाव असून, ते राज्य परिवहन महामंडळाच्या काटोल आगारात वाहतूक निरीक्षक म्हणून कार्यरत होते. नोकरीव्यतिरिक्तचा वेळ सामाजिक कार्यात देत असल्यामुळे ते सर्वत्र सुपरिचित होते. त्यांच्या तोंडावर फोड आल्यामुळे काही दिवसांपूर्वी नंदनवनमधील यश बीअर बारच्या मागे असलेल्या जमाईवार हॉस्पिटलमध्ये ते उपचाराला गेले. किशोर यांची पत्नी सुनंदा यांच्या तक्रारीनुसार, डॉ. भूपेंद्र जमाईवार यांनी किशोर यांना छोटीशी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार गावंडे आपल्या परिवारासह ८ मेच्या दुपारी २.३० वाजता जमाईवार हॉॅस्पिटलमध्ये गेले. तोपर्यंत सर्व ठीक होते. डॉक्टरने शस्त्रक्रियेपूर्वी गावंडेंना सलाईन लावली. त्यात काही इंजेक्शनही टाकले. त्यानंतर काही वेळेतच किशोर यांची प्रकृती खालावली. ते ओकारी करू लागले. तोंडातून फेसही येऊ लागला. डॉक्टरांनी अॅम्बुलन्स बोलवली आणि त्यांनी सेंट्रल एव्हेन्यूवरील रहाटे हॉस्पिटलला नेले. तेथे ४ ते ४.१५ या वेळेत किशोर यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. रात्री ११.३० वाजता डॉक्टरांनी शवविच्छेदनासाठी किशोर यांचा मृतदेह पोलिसांच्या हवाली केला. चांगले हसतखेळत रुग्णालयात गेलेल्या किशोर यांचा मृत्यू नेमका कसा झाला, ते डॉक्टरांनी सांगितलेच नाही. त्यांना सलाईनमधून कोणती औषधे दिली, त्याचाही खुलासा डॉ. जमाईवार यांनी केला नाही. पतीचा असा तडकाफडकी मृत्यू झाल्यामुळे सुनंदा गावंडे आणि त्यांचा परिवार झटक्यात निराधार झाला आहे. मनमिळावू स्वभाव आणि सामाजिक कार्यात धावून जाण्याची वृत्ती असलेल्या किशोर यांच्या अकाली निधनाने परिसरातही तीव्र शोककळा पसरली आहे.