बेला : काेळसा भरलेला ट्रक रस्त्यावर उलटला. अशात मार्गाने जाणारा अन्य ट्रक त्यावर धडकला. त्यात गंभीर दुखापत झाल्याने ट्रकचालकाचा मृत्यू झाला. ही घटना बेला पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील सिर्सी वाय पाॅईंट परिसरात गुरुवारी (दि.१) रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली.
अनिल ज्ञानबाजी गाेडगाेने (४८, रा. वर्धा) असे मृत ट्रकचालकाचे नाव आहे. मृत अनिल हा एमएच-३२/बी-९४५८ क्रमांकाच्या ट्रकमध्ये तांदूळ भरून उमरेडकडून वर्धा येथे जात हाेता. दरम्यान, सिर्सी वाय पाॅईंट परिसरात एमएच-४०/एके-०७६९ क्रमांकाचा काेळसा भरलेला ट्रक उलटल्यानंतर, रस्त्यावर अपघात हाेईल अशा स्थितीत ते वाहन असताना चालक तेथून निघून गेला हाेता. यामुळे उलटलेल्या ट्रकवर अनिलचा ट्रक धडकला. त्यात गंभीर दुखापत झाल्याने ट्रकचालक अनिलचा मृत्यू झाला.
याप्रकरणी तानाजी धाेंडूजी चवरे (४९, रा. वाॅर्ड नं. ५, वर्धा) यांच्या तक्रारीवरून बेला पाेलिसांनी भादंवि कलम २८३, ३०४ (अ), सहकलम १३४, १७७ माेटार वाहन कायद्यान्वये गुन्हा नाेंदविला असून, आराेपीचा शाेध सुरू केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पाेलीस उपनिरीक्षक ठेंगणे करीत आहेत.