नागपूर काँग्रेस अधिवेशनाचे वैशिष्ट्य म्हणजे मराठीचा प्रभाव. हे राष्ट्ररूपिणी गंगे घेई नमस्कार माझा आणि जयहिंद देवीची बोला, हर हर महादेव बोला, ही आनंदराव कृष्णाची टेकाडे यांनी रचलेली गीते या अधिवेशनात राष्ट्रगीते म्हणून गायिली गेली.
----------------------
साहित्यिकांना माहीत आहेत का आनंदराव टेकाडे ?
आनंदराव टेकाडे यांच्या घराण्याचे मूळ गाव नागपूर जिल्ह्यातील मोहपा; पण त्यांचा जन्म धापेवाडा येथे आईच्या घरी झाला. वयाच्या सहाव्या वर्षी वडील निवर्तल्यानंतर मामांनी त्यांचे संगोपन केले. सहाव्या वर्षानंतर आजारपणामुळे शिक्षण सोडले आणि पुढे ते अपूर्णच राहिले. त्यामुळे आनंदरावांनी स्वत:लाच आत्मनिवेदनात ‘भाषा-निरक्षर’ असे म्हटले आहे.
कथा-कीर्तने, पुराणे, आख्याने इत्यादींच्या संस्कारांतून त्यांना भारतीय इतिहासाची व परंपरेची ओळख झाली व त्या संदर्भाचा अत्यंत प्रभावी उपयोग त्यांनी आपल्या काळातील प्रतिमा-प्रतिकांच्या योजनेसाठी केला. १९१० सालच्या सुमारास, वयाच्या विशीतच त्यांनी राष्ट्रीय जाणिवांच्या प्रभावी काव्यलेखनास सुरुवात केली. गोपाळ कृष्ण गोखले यांच्या मृत्यूनंतर त्यांनी त्या संदर्भात आपली पहिली कविता लिहिली. ‘शारदा देवी’या शीर्षकाची कविता सर्वप्रथम वासुदेवराव आपटे यांच्या ‘आनंद’ मासिकात १९११ साली प्रसिद्ध झाली. त्यांच्या प्रारंभीच्या कविता ‘खेळगडी’, लोकमित्र, चित्रमय जगत व हरिभाऊ आपट्यांचे करमणूक या नियतकालिकात प्रसिद्ध झाल्या. आनंदरावांच्या काव्यलेखनामागे लोकमान्य टिळकांच्या जहाल राष्ट्रवादी विचारांची प्रेरणा प्रामुख्याने होती. १९१४ सालच्या सुमारास जाहीर कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय कविता गाऊन सादर करण्याच्या प्रयोगाला सुरुवात झाली. तेव्हापासून स्वातंत्र्याच्या चळवळीनिमित्त महाराष्ट्रात आणि विशेषत: नागपुरात आनंदरावांचे देशभक्ती गीतगायन हा एक अविभाज्य भागच बनला होता.
स्वातंत्र्याकांक्षेने भारलेल्या राष्ट्रीय काव्याच्या ऐन भराच्या त्या कालखंडाचा एक महत्त्वपूर्ण काव्यारव टेकाड्यांचा होता.
राष्ट्रभक्तीप्रमाणेच राधाकृष्णभक्ती हा सुद्धा त्यांच्या कवितेचा एक प्रधान विषय आहे. दोन्ही भक्तींचा उत्कट प्रत्यय टेकाड्यांच्या काव्यातून येतो. त्यांची सर्वाधिक गाजलेली कविता, आनंदकंद ऐसा, हा हिंद देश माझा, सत्यास ठाव देई, वृत्तीस ठेवी न्यायी, स्वत्वास माळी राजा, हा हिंद देश माझा।
टेकाड्यांची कविता सर्वसामान्य रसिकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाली. राष्ट्रीय चळवळीचा एक भाग झाल्याने ती कालसापेक्ष परिघात अधिक अडकली, तरी या कवीचे मराठी काव्यप्रवाहातील, राष्ट्रीय काव्यविश्वातील आणि गीतपरंपरेतील स्थान ऐतिहासिक महत्त्वाचे ठरते.
तत्कालीन कवि संमेलने अन् साहित्य संमेलने हमखास गाजविणारे ते एक केंद्रवर्ती कवि-व्यक्तिमत्त्व होते. गायनाचे कुठलेही पारंपरिक व शास्त्रीय शिक्षण न घेताही भावनानुकूल काव्यगायनाचे ते एक आदर्श ठरले होते. आनंदगीत या एका शीर्षकाखाली त्यांच्या काव्याचे चार भाग १९२०, १९२४, १९२८ व १९६४ असे कालानुक्रमे प्रसिद्ध झालेले आहेत. या चारही भागात त्यांची बहुतांश कविता संग्रहित करण्यात आलेली आहे.
----------
-