लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पश्चिम महाराष्ट्रातील पूरपरिस्थिती लक्षात घेता नागपूर जिल्ह्यामधील नदी-नाले, धरणे, तसेच तलाव याबाबत योग्य खबरदारी घेण्याची गरज आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती उद्भवली होती. त्यामुळे पशुधन, शेती व मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली होती. या वर्षी तशी परिस्थिती उद्भवू नये, यासाठी तालुकास्तरावरील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा २४ तास सुरू ठेवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी विमला आर. यांनी दिले.
आपत्ती व्यवस्थापन विभागाने आंतरराज्य संपर्क व समन्वयदेखील वाढविला गेला पाहिजे. पूरपरिस्थितीत बचावकार्यासाठी लागणारी अत्यावश्यक साधनसामग्रीही जिल्हा प्रशासनाकडे आहे. राज्य सरकारकडून नुकत्याच १० रबर बोटी पुरविण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील ३८१ पूरप्रवण गावात निवारागृहे, नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे मार्ग आदी बाबीही तपासून घेण्यात आल्या आहेत. पुरात पाण्याखाली जाणारे रस्ते व पुलांची सार्वजनिक बांधकाम विभागाने पाहणी केली असून धोक्याच्या ठिकाणी सूचना फलक लावण्यात आले आहेत. तालुकानिहाय हेलिपॅड उभारण्यासाठी लागणाऱ्या जागांची पाहणी करण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
तोतलाडोहच्या साठ्याकडे विशेष लक्ष
मध्य प्रदेशातील चौराई धरणातील पाण्याचा विसर्ग केल्यास ते पाणी तोतलाडोह धरणात येण्यास साधारणत: २४ दिवस लागतात. तोतलाडोह धरणातून नवेगाव खैरी प्रकल्पात पाणी येण्यास ३ ते ४ तास तर नवेगाव खैरीतून पेंच व कन्हान येथील बीना संगमला येण्यास ५ ते ६ तासांचा वेळ लागतो. मध्य प्रदेशातील पाऊस व त्यातून गेल्या वर्षी उद्भवलेली पूरपरिस्थिती बघता या वर्षी तोतलाडोह ते गोसीखुर्द पाण्याचा प्रवासावर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.