नागपूर : नवजात बालकाच्या हृदयरोगाचे वेळीच निदान न झाल्याने देशात दरवर्षी ६० ते ८० हजार बालके मृत्यूला समोर जातात. यामुळे या रोगांच्या लक्षणांची, वेळीच निदान करण्याची व योग्य उपचार पद्धती उपलब्ध असल्याची व्यापक जनजागृती होणे आवश्यक आहे, असे मत डॉ. अभय भोयर यांनी व्यक्त केले.अकादमी आॅफ पिडियाट्रिक्स आणि क्रिष्णा इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेसच्यावतीने रविवारी एक दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते ‘बालकांमधील हृदयविकार’ या विषयावर बोलत होते. डॉ. भोयर म्हणाले, जन्म घेणाऱ्या १०० नवजात शिशुंपैकी एक बालक हृदयविकाराने ग्रासलेले असते. कधी कधी तर गर्भात वाढत असलेल्या अर्भकावर उपचार करण्याची वेळ येते, तर जन्म घेतल्यानंतर लगेच शिशुच्या हृदयावर शस्त्रक्रिया करावी लागते. शस्त्रक्रियेसोबतच अनेक पर्याय हृदयविकारावर उपलब्ध असल्याचेही ते म्हणाले.या परिषदेला प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. उदय बोधनकर, डॉ. वसंत खळतकर, डॉ. यशवंत पाटील, डॉ.डी.एस.राऊत, डॉ. खेमका, डॉ. गिरीश सुब्रमण्यम, डॉ. सतीश देवपुजारी, डॉ. शंतनु सेनगुप्ता, डॉ. संदीप खानझोडे, डॉ. बोकडे, डॉ. सौरभ वाशिने, डॉ. अविनाश गावंडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी अकॅडमी आॅफ पिडियाट्रिक्स नागपूर शाखेचे अध्यक्ष डॉ. आर.जी.पाटील, सचिव डॉ. गिरीश चरडे व संयोजक डॉ. संजय देशमुख यांनी विशेष परिश्रम घेतले.(प्रतिनिधी)
नवजात बालकाच्या हृदय रोगाचे वेळीच निदान आवश्यक
By admin | Updated: March 23, 2015 02:18 IST