नागपूर : शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाला अतिविशेषोपचार रुग्णालयाचा दर्जा देण्याचा प्रस्ताव नुकताच सादर करण्यात आला. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रस्तावाला समर्थन देत वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडे पाठविला आहे. यामुळे अतिविशेषोपचार रुग्णालयाचा मार्ग मोकळा झाल्याचे बालले जात आहे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनय हजारे यांच्या विशेष मार्गदर्शनात हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.दंत महाविद्यालय व रुग्णालयात रुग्णांवर अत्याधुनिक उपकरणे आणि साधनसामुग्रीद्वारे उपचार केले जातात. डेंटल इम्प्लांट, लेझर थेरपी, सीटी स्कॅन, कॅन्शिअस सिडेशन, ओरल कॅन्सरवर आधुनिक पद्धतीच्या निदान व उपचार पद्धती या रुग्णालयात उपलब्ध आहेत. यात आणखी काही साधनांची भर पडल्यास फक्त औपचारिकता असलेल्या अतिविशेषोपचाराचा दर्जा संस्थेत प्राप्त होणार आहे, अशी माहिती डॉ. हजारे यांनी दिली. महाविद्यालयाचे मुखशल्यशास्त्राचे विभाग प्रमुख डॉ. प्र. क. पंदिलवार यांनी ट्रामासेंटरच्या सर्व सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यांची चमू मॅक्सीलोफेसिअल ट्रामा हाताळण्यास सज्ज आहे. कृत्रिमदंतशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. अरुण खळीकर यांनी कॅडकॅम या आधुनिक तंत्रज्ञानाच्या अवलंबनावर भर दिलेला आहे. डॉ. वसुंधरा भड यांनी आपल्या दंतव्यंगोपचारशास्त्र विभागात चौकटी बाहेर जाऊन इनव्हीजीलाईन ट्रीटमेंट आणि आॅबस्ट्रक्टीव स्लिप अपनिया या क्षेत्रात संशोधनावर लक्ष केंद्रित केले आहे. महाविद्यालयातील मुखरोग निदानशास्त्र विभागात मध्य भारतातील सर्वात प्रगत सिटी स्कॅन मशिन उपलब्ध आहे. विभाग प्रमुख डॉ. एस.पी. कुंभारे, डॉ. मंगेश फडनाईक, डॉ. रितेश कळसकर, डॉ. मंजुषा वऱ्हाडपांडे व डॉ. सी.मी.गणवीर, डॉ. वैभव कारेमोरे व डॉ. दर्शन दक्षिणदास यांच्या सहकार्याने सर्व सामान्यापर्यंत प्रभावी उपचार पद्धती पोहचविण्याचा प्रयत्न होत आहे. सामाजिक दंतशास्त्र विभागाचा कार्यभार स्वत: अधिष्ठाता डॉ. हजारे यांनी सांभाळला आहे. (प्रतिनिधी)
दंत महाविद्यालयाला अतिविशेषोपचार रुग्णालयाचा दर्जा!
By admin | Updated: January 18, 2015 00:56 IST