रामटेक : शासकीय कर्मचाऱ्यांनी गुरुवारी (दि. २६) केलेल्या देशव्यापी आंदाेलनात रामटेक तालुक्यातील अखिल भारतीय किसान सभा, सिटू (सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन), आशा गटप्रवर्तक कर्मचारी युनियन अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले हाेते. त्यांनी रामटेक तहसील कार्यालयासमाेर निदर्शने केली.
केंद्र शासनाने कृषी व कामगार कायद्यांमध्ये सुधारणा केल्या आहेत. या सुधारणांना विराेध दर्शविण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी गुरुवारी देशव्यापी आंदाेलन केले. कृषी व कामगार कायद्यांमध्ये करण्यात आलेल्या नवीन सुधारणा रद्द करा, महागाईला आळा घाला, सरकारी क्षेत्रातील खासगीकरण बंद करा, मनरेगामध्ये २०० दिवसांचे काम उपलब्ध् करून द्या, आयकर न भरणाऱ्या नागरिकांना ७,५०० रुपयांची आर्थिक मदत करा, आशासेविका व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या, त्यांना किमान वेतन कायदा लागू करा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
आंदाेलनात किसान सभेचे राजू हटवार, आयटकचे ॲड. आनंद गजभिये, सिटूच्या कल्पना हटवार यांच्यासह नीता भांडारकर, वर्षा वानखेडे, भीमराव गाेंडाणे, पुष्पा ठाकरे, छाया शेंडे, मंदा चाैधरी, विजय कश्यप यांच्यासह अंगणवाडी व आशासेविका सहभागी झाल्या हाेत्या.