लाेकमत न्यूज नेटवर्क
खापा : पाण्याच्या शाेधात वाट भरकटलेले हरिण नागरी वस्तीत आले आणि माेकाट कुत्र्यांच्या त्याच्यावर हल्ला चढवला. यात गंभीर जखमी झालेल्या त्या हरणाचा उपचारासाठी नागपूरला नेताना वाटेतच मृत्यू झाला. ही घटना सावनेर तालुक्यातील नंदापूर शिवारात साेमवारी (दि. १२) सकाळी घडली.
नंदापूर परिसरात जंगली भाग असून, त्या भागात हरणांचा वावर आहे. कळपातील एक हरिण पाण्याच्या शाेधात निघाले आणि वाट भरकटल्याने ते नंदापूर गावात शिरले. त्यातच माेकाट कुत्र्यांचा त्या हरणाकडे लक्ष गेले आणि त्यांनी हरणाचा पाठलाग सुरू केला. जीवाच्या आकांताने सैरावैरा पळत सुटलेले हरिण अनावधानाने झुडपात अडकले आणि कुत्र्यांनी लचके ताेडून त्याला गंभीर जखमी केले. ही बाब लक्षात येताच नंदापूर येथील काही तरुणांनी त्या माेकाट कुत्र्यांना पिटाळून लावत त्यांच्या तावडीतून हरणाची सुटका केली.
याच तरुणांनी लगेच वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण नाईक यांना माहिती देत जखमी हरणाला त्या झुडपातून बाहेर काढले. वनरक्षक ज्ञानेश्वर भोसले यांच्यासह वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून हरणाला ताब्यात घेत उपचारासाठी वन विभागाच्या नागपूर येथील रेस्क्यू सेंटरमध्ये रवाना केले. मात्र, वाटेतच त्या हरणाचा मृत्यू झाला, अशी माहिती वन कर्मचाऱ्यांनी दिली.