नागपूर : प्रकरण कोर्टात असतानाही हुडकोने (हाउसिंग अॅण्ड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि., नवी दिल्ली) सन २०१४ पासून कर्जावर चक्रवाढ व्याजाची आकारणी करून रामनाथ सिटीचे गुप्ता बंधू यांनी ६५.१४ कोटी रुपये थकविण्याची तक्रार कोराडी पोलीस ठाण्यात नोंदविली. तक्रारीच्या आधारे रामनाथ सिटीचे गुप्ता बंधूंविरुद्ध वृत्तपत्रांमध्ये बातम्या छापून आल्या. हुडकोने खोटी तक्रार दाखल केली असून रामनाथ सिटीचे कोणतेही कर्ज थकविले नाही. हे प्रकरण कोर्टात असल्याने कर्ज भरणे थांबले आहे, असे रामनाथ सिटीचे संचालक सुदेश चंद्रा गुप्ता यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, रामनाथ सिटीचे मुख्यालय झांशी येथे असून कंपनीच्या कोराडी रोड येथील रामनाथ सिटी प्रकल्पासाठी हुडकोने २००९ ला कर्ज दिले. हुडको २०१४ मध्ये कर्ज वसुलीसाठी कर्ज वसुली लवाद (डीआरटी), मुंबई येथे गेली. त्या वेळी हुडकोने कंपनीकडून ३१.३२ कोटी वसूल करायचे असल्याचे सांगितले. याविरुद्ध कंपनीने हुडकोविरोधात २०१६ मध्ये मुंबई हायकोर्टात केस दाखल केली. नंतर हुडकोने २०२० मध्ये अलाहाबाद येथील राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाकडे (एनसीएलटी) केस दाखल केली. त्या वेळी हुडकोने कंपनीकडून ६४ कोटी रुपये वसूल करायचे असल्याचे लवादाकडे सांगितले. पण, कंपनीला हुडकोला २४.४४ कोटी रुपये द्यायचे आहेत. कोर्टात केस असतानाही हुडकोने २०१४ पासून चक्रवाढ व्याज आकारून कर्जाची रक्कम ६५.१४ कोटींवर नेली आहे. विविध कोर्टात केस दाखल करून हुडको कंपनीची बदनामी करीत आहे. त्यामुळे कंपनीने हुडकोविरुद्ध १३६५ कोटी रुपयांचा बदनामीचा दावा टाकला आहे. पोलिसांनी कंपनीची सत्य बाजू ऐकून न घेता आणि प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही कंपनीविरुद्ध चुकीचा एफआयआर नोंदवित आला, असा दावाही गुप्ता यांनी केला.