उमा वैद्य : आयकर विभागाचा सांस्कृतिक महोत्सवनागपूर : आमचे दैनंदिन जीवन अतिशय व्यस्त झाले आहे. पण आमच्या संस्कृतीचा परिचय अशा सांस्कृतिक महोत्सवातूनच होतो. अशा आयोजनातून आम्हाला नवी ऊर्जा, स्फूर्ती आणि आपल्यात असलेल्या कलागुणांना इतरांसमोर प्रदर्शित करण्याची संधी मिळते, असे मत कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उमा वैद्य यांनी शुक्रवारी व्यक्त केले. आयकर विभागाच्यावतीने आयोजित सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन आज करण्यात आले, याप्रसंगी त्या बोलत होत्या. हा कार्यक्रम राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीच्या सभागृहात पार पडला. याप्रसंगी मुख्य आयकर आयुक्त गुंजन मिश्रा यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला. यावेळी डॉ. उमा वैद्य, आयकर आयुक्त बुटासिंह, आशा अग्रवाल, मयंक प्रियदर्शी प्रामुख्याने उपस्थित होते. आशा अग्रवाल यांनी प्रास्ताविकातून महोत्सवाची रूपरेखा स्पष्ट केली. वरिष्ठ अनुवादक शंकर कनोजिया यांनी अतिथींचा परिचय करून दिला. उमा वैद्य म्हणाल्या, कलांमध्ये रमल्यामुळे आपले प्रबंधन कौशल्य विकसित करण्यासाठी चांगली संधी मिळते. आजच्या जागतिकीकरणाच्या काळात आम्ही आपल्या संस्कृतीपासून दूर जातो आहोत. अशा वेळी हे महोत्सव आपल्याला अतिशय महत्त्वाचे आहे. अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्रात ज्या संहिता आहेत त्या संस्कृतमध्ये आहेत. त्याचा संबंध प्रत्यक्ष करप्रणालीशीच आहे. या कामात विद्यापीठाची मदत हवी असल्यास आम्ही तयार आहोत, असे आवाहनही त्यांनी केले. गुंजन मिश्रा यांनी सांस्कृतिक महोत्सवात पराभव- विजयाचे फारसे महत्त्व नसते. यात सहभागी होणेच जास्त महत्त्वाचे आहे. याप्रसंगी त्यांनी सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला आयकर विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन शिरीन युनुस आणि शंकर कनोजिया यांनी केले.
सांस्कृतिक कार्यक्रमातून नवी ऊर्जा मिळते
By admin | Updated: January 19, 2015 00:51 IST