नागपूर : एसएनडीएलला विविध प्रकारच्या सेवा पुरवणारे ४० कंत्राटदार थकीत रक्कम वसूल करण्याच्या उद्देशाने बेमुदत संपावर गेले आहेत. या कंत्राटदरांकडे जवळपास ७०० कर्मचारी कार्यरत असून मीटर रिडींग, तक्रार व सुधार, मीटर दुरुस्ती, बिलींग आदी कामे प्रभावित होऊन शहरात विजेचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. बुधवारी सायंकाळी आयोजित पत्रपरिषदेमध्ये कंत्राटदार महेंद्र जिचकार यांनी सांगितले की, वीज वितरण कंपनी बदलताच थकीत रकमेतही वाढ होत आहे. कंत्राटदारांना सातत्याने ठगविले जात आहेत. स्पॅन्को कंपनीवर २०१२ पर्यंतचे ६ कोटी रुपये थकीत कायम होते. त्यानंतर एसएनडीएलचे आणखी ९ कोटी रुपये अधिकचे थकीत आहेत. एसएल ग्रुपने फ्रेन्चाईजी घेतल्यानंतर जुनी थकीत देण्यास त्यांची तयारी दिसत नाही. ‘कॉन्ट्रॅक्ट’ आणि ‘वर्क आॅर्डर’मध्ये थकीत रक्कम वितरित करणे नवीन कंपनीची जबाबदारी राहील, असे स्पष्ट सांगण्यात आलेले आहे. ७ दिवसांपूर्वी आम्ही आंदोलनाची नोटीस दिली होती. यानंतर पुन्हा तीन दिवसांची नोटीस दिली होती. परंतु कंपनीने यावर कुठलीही गंभीरता दाखविलेली नाही. कंत्राटदार रोशन ठाकूर यांनी सांगितले की, कंपनी फायद्यात आहे. परंतु थकीत रक्कम देण्यासाठी मात्र भ्रम निर्माण केला जात आहे. कंत्राटदारांमध्ये फूट टाकण्याचाही प्रयत्न केला जात आहे. सेवा रद्द करण्याची धमकी सुद्धा दिली जात आहे. कंत्राटदारांनी सांगितले की, यापूर्वी सुद्धा कंत्राटदारांना ३० दिवसात थकीत रक्कम देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. परंतु अद्याप एकालाही थकीत रक्कम मिळालेली नाही. थकीत रकमेबाबत कंपनीने ऊर्जामंत्र्यांचीही दिशाभूल केलेली आहे. हे सर्व प्रकार फसवणूक करणारे आहेत. फ्रेन्चाईजी कंपनी थकीत रक्कम देत नसल्याने कंत्राटदारांना आपल्या कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांचेही नुकसान होत असल्याचेही त्यांनी सांगितले. पत्रपरिषदेत कंत्राटदार अजय त्रिपाठी, विष्णुपंत मोटघरे, सुनील वत्स आदींसह ४० कंत्राटदार उपस्थित होते. (प्रतिनिधी)
एसएनडीएलवर संकट
By admin | Updated: January 22, 2015 02:39 IST