उमरेड : कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांची, तसेच कोरोनाची लक्षणे आढळून येत असलेल्या नागरिकांची चाचणी उमरेडच्या ग्रामीण रुग्णालयात केली जात आहे. याठिकाणी दररोज शंभरावर लोकांची चाचणी होते. याच परिसरात ४५ वर्षांवरील, तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणाची सुविधा करण्यात आली आहे. एकाच छताखाली नागरिकांच्या रांगा, उपस्थिती आणि संपर्क धोकादायक ठरणार नाही का, असा सवाल विचारला जात आहे.
ग्रामीण रुग्णालयाच्या बाहेरील आवारात एका छोट्याशा खोलीत कोरोना चाचणी केली जाते. तत्पूर्वी याठिकाणी नोंदणीसाठीचे चार वेगवेगळे काउंटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. अगदी या काउंटरच्या अलीकडे खेटूनच लसीकरणाची रांग लागलेली असते. यामुळे कोरोना चाचणी करणारे नागरिक कधी लसीकरणाच्या रांगेत, तर लसीकरणासाठी आलेले नागरिक कोरोनाच्या काउंटरवर, असा गोंधळ बऱ्याचदा उडतो.
एकाच छताखाली चाचणी अन् लसीकरण ही युक्ती नेमकी कुणाची असा असाल विचारला जात आहे. कोरोना चाचणी अन्यत्र योग्य ठिकाणी हलविण्याची मागणी केली जात आहे. याबाबत ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने अनेकदा तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीला सांगितल्याची बाब समोर येत आहे. तहसीलदार प्रमोद कदम यांच्याकडे ही समस्या सांगितली, अद्याप यावर उपाययोजना करण्यात आली नाही, असा आरोप व्यक्त होत आहे. या गंभीर विषयावर चर्चा करण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप धरमठोक, ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस. एन. खानम यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बोलण्याचे टाळले. ग्रामीण रुग्णालय परिसरात कोरोना चाचणी नको, असा सूर व्यक्त होत आहे. उमरेड तालुक्यात आतापर्यंत एकूण २७,६८१ नागरिकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये १२,१५७ आरटीपीसीआर, तर १५,५२४ अँटिजन टेस्टचा समावेश आहे.
कर्मचाऱ्यांना हवी सुरक्षितता
कोरोना चाचणी प्रक्रियेदरम्यान कार्यरत आरोग्य कर्मचारी, तसेच याकिठाणी कार्यरत शिक्षकांनाही शासनाने सुरक्षिततेसाठी अत्यावश्यक योग्य साहित्याचा पुरवठा करावा, अशीही बाब बोलली जात आहे.