लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोविड संक्रमणाचा धोका विचारात घेता राज्य सरकारने नागपूर महापालिकेची होणारी सर्वसाधारण सभा ऑनलाईन घेण्याचे आदेश जारी केले आहे. ३ जुलै २०२० च्या आदेशानंतर मनपाच्या सर्व सभा ऑनलाईन होत आहेत. यामुळे सभेत प्रश्न मांडता येत नसल्याने सत्तापक्षासोबतच विरोधी पक्षातील नगरसेवक नाराज आहेत.
मागील आठ महिन्यापासून ऑनलाईन सभा होत असल्याने प्रभागातील नागरिकांच्या समस्या सभागृहात मांडता येत नाही. तसेच कामचुकार अधिकाऱ्यांना धारेवर धरण्याची संधी मिळत नाही. यामुळे व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून होणाऱ्या रद्द करून सभागृहात सभा घेण्याला मंजुरी द्यावी अशी मागणी नगरसेवक करीत आहेत.
कोविडच्या अनलॉक प्रक्रियेनंतर सर्व व्यवहार सुरू झाले आहेत. सिनेमागृह, स्विमिंग पूल, पूर्ण क्षमतेने सुरू करण्याला परवानगी मिळाली. परंतु नागरिकांच्या समस्या मांडण्याचे व्यासपीठ असलेल्या सभागृहावर निर्बंध कशासाठी असा प्रश्न नगरसेवकांनी उपस्थित केला आहे.
विरोधी पक्षनेते तानाजी वनवे म्हणाले, आयुक्तांनी काही शिर्षकात निधी उपलब्ध केला. परंतु सत्तापक्षाने वाटपात पक्षपात केला. सर्वसाधारण सभेत प्रशासन व सत्तापक्षाच्या विरोधात आवाज उठवता येतो. परंतु ऑनलाईन सभेमुळे शक्य होत नाही. विरोधी सदस्यांना बाजू मांडता येत नाही. अनेकदा तांत्रिक अडचणी येतात. याचा विचार करता ऑनलाईन सभा बंद झाल्या पाहिजे.