याेगेश गिरडकर
लाेकमत न्यूज नेटवर्क
सावरगाव : यावर्षी नरखेड तालुक्यातील कपाशीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. कापसाचा पहिला वेचा शेतकऱ्यांच्या घरी आला असून, दुसऱ्या वेच्याचा कापूस वेचण्यासाठी मजूर मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यातच ढगाळ वातावरण व पावसाच्या शक्यतेमुळे शेतकरी चिंतित आहेत.
अती पावसामुळे नरखेड तालुक्यातील साेयाबीनसह इतर खरीप पिके नष्ट झाली आहेत. कपाशीचे पीक थाेडेफार बरे असल्याने शेतकऱ्यांनी कपाशीवर लक्ष केंद्रित केले. मात्र, सुरुवातीच्या काळातच कपाशीवर गुलाबी बाेंडअळीचा प्रादुर्भाव झाला. बाेंडअळीपासून पिकाला वाचविण्यासाठी महागड्या कीटकनाशकांची फरवाणी करावी लागल्याने यावर्षी कापसाचा उत्पादनखर्चही वाढला आहे. दुसरीकडे, बाेंडअळीने पहिल्या फ्लॅशची बाेंडे फस्त केल्याने कापसाच्या उत्पादनात घट आली आहे, अशी माहिती अनंता गाेडबाेले, रा. सावरगाव यांच्यासह नरखेड तालुक्यातील इतर कापूस उत्पादकांनी दिली.
सध्या कापूस वेचणीला आला असून, ही दुसरी वेचणी आला. कापूस वेचणीला मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांसमाेर नवे संकट निर्माण झाले आहे. तालुक्यात सर्वत्र किलाेप्रमाणे कापसाची वेचणी केली जाते. मात्र, यावेळी मजूर किलाेप्रमाणे वेचणी करायला तयार नसून, त्यांना दिवसाप्रमाणे मजुरी हवी आहे. पूर्वी एक महिला दिवसभरात ६० ते ८० किलाे कापूस वेचायची. आता केवळ १० ते १२ किलाे कापूस वेचत असल्याने प्रति किलाे १८ ते २० रुपये माेजावे लागतात, अशी माहिती पिपळा (केवळराम) येथील वासुदेव बारमासे, भालचंद्र बारमासे, सावरगाव येथील राजेश रेवतकर यांच्यासह शेतकऱ्यांनी दिली.
....
मजुरीचे दर २०० रुपयांवर
मजुरांच्या कमतरतेमुळे मजुरीचे दर वाढले आहेत. महिला मजुरांना प्रत्येकी किमान २०० रुपये मजुरी द्यावी लागते. एक महिला दिवसभरात केवळ १० ते १२ किलाे कापसाची वेचणी करते. पूर्वी कापूस वेचणीचा खर्च प्रति किलाे ७ ते ८ रुपये हाेता. आता मजुरांच्या कमतरतेमुळे तसेच एक महिला दिवसभरात १० ते १२ किलाे कापूस वेचत असल्याने प्रति किलाे १८ ते २० रुपये माेजावे लागतात.
...
घरातील सदस्यांकडून वेचणी
वाढीव मजुरी देऊनही कापूस वेचणीला मजूर मिळत नसल्याने घरातील सदस्यांकडून कापूस वेचणी करावी लागत असल्याचे सावरगाव येथील संजय रेवतकर यांनी सांगितले. पावसामुळे कापूस भिजण्याची शक्यता असल्याने हा प्रकार नरखेड तालुक्यातील प्रत्येक कापूस उत्पादक शेतकरी अवलंबत आहेत.