नागपूर : जागतिक स्तरावर आणि भारतीय बाजारात मंदीचे वातावरण असल्यामुळे कापसाला मागणी नाही, शिवाय गेल्यावर्षीचा साठा शिल्लक असल्यामुळे यंदा कापसाचे भाव वाढणार नाहीत, अशी माहिती कापूस पणन महासंघाचे अध्यक्ष एन.पी. हिराणी यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत दिली.शासनाचा कापूस खरेदीचा शुभारंभ गुरुवारी विदर्भात नागपूर विभागातील विनायक जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी, चिमणाझरी या केंद्रावर हिराणी यांच्या हस्ते झाला. पत्रपरिषदेत हिराणी म्हणाले, चिमणाझरी (नागपूर), बालानगर (औरंगाबाद) आणि मुक्ताईनगर (जळगांव) या तीन केंद्रावर जवळपास ४०० क्विंटल कापूस खरेदी केला. शुक्रवारी १७ केंद्रावर कापूस खरेदी करण्यात येणार आहे. एकूण ९६ केंद्र आणि १५० जिनिंग व प्रेसिंगमध्ये तीन टप्प्यात कापूस खरेदी करण्यात येईल. गेल्यावर्षी महासंघाने २७ लाख क्विंटल कापूस खरेदी केला होता. यंदा १०० लाख टन खरेदीचे उद्दिष्ट आहे. यंदा कापसाच्या तंतूची लांबी आणि तलमतेच्या दर्जानुसार ३९०० ते ४१०० रुपये हमी भाव आहे. त्यापेक्षा जास्त किंमत शेतकऱ्यांना देता येणार नाही. त्यांना जास्त भाव मिळाल्यास शेतकऱ्यांनी खासगी व्यापाऱ्यांना कापूस विकावा, असे हिराणी म्हणाले.(प्रतिनिधी)कापूस उत्पादनात भारत पहिलाकापूस उत्पादनात भारत पहिल्या क्रमांकावर आहे. यंदा ३७० लाख गाठी तयार होण्याची अपेक्षा आहे. त्यातुलनेत दरवर्षी निर्यात कमी होत आहे. गेल्यावर्षी ६० लाख गाठींची निर्यात झाली. शिवाय उच्चतम तलम कापसाच्या १२ लाख गाठी आयात केल्या. चीनजवळ जास्त प्रमाणात कापूस शिल्लक असल्याचा परिणाम भारताच्या निर्यातीवर पडला. शिवाय टेक्सटाईल क्षेत्राचीही कठीण परिस्थिती आहे. सूत गिरण्यांचा तोटा सहन करावा लागत आहे. भारतात कापसाचा पेरा कमीहिराणी म्हणाले, जगात यावर्षी कापसाचे उत्पादन ३१.६ दशलक्ष हेक्टरवर २४.६९ दशलक्ष टन अपेक्षित आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत ते ६ टक्के कमी आहे. २००९-१० पासून हे सर्वात कमी उत्पादन असल्याचा अंदाज आहे. भारतात ६.५ दशलक्ष टन म्हणजेच ३७० लाख गाठी तयार होतील. जगात २२ दशलक्ष टन जास्त साठा आहे. हा साठा जास्त असल्यामुळे कापसाला भाव कमी राहील. खरेदीसाठी १५० कोटींची मागणीकापूस खरेदीसाठी महासंघाने शासनाकडे मार्जिन मनी म्हणून १५० कोटी रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी ५० कोटी मिळाले. मार्जिन मनीच्या आधारावर बँकेकडून १ हजार कोटींचे कर्ज घेता येईल. त्यामुळे शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यास त्रास होणार नाही. केंद्राच्या टेक्सटाईल आयोगाच्या सूचनेनुसार मॉईश्चर मीटर लावून ८ ते १२ टक्के ओलावा असलेला कापूस खरेदी केला जाईल. ८ टक्के ओलावा असलेल्या पूर्ण किंमत मिळेल तर त्यावर ओलावा असल्यास पैसे कापले जाणार आहे.‘आरटीजीएस’द्वारे बँकेत रक्कम जमा होणारशेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या कापसाची रक्कम थेट आरटीजीएसद्वारे त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. त्यासाठी खरीप हंगाम-२०१५ मधील पीक पेऱ्याची अद्यावत नोंद असलेला सातबारा उतारा, आयएफएससी कोड असलेले बँकेच्या पहिल्या पानाची व आधारकार्डची छायांकित प्रत इत्यादी कागदपत्रे आणणे शेतकऱ्यांना अनिवार्य असल्याचे हिराणी म्हणाले.गेल्यावर्षी १०६६ कोटींच्या कापसाची खरेदीगेल्यावर्षी १०६६.४ कोटी रुपये किमतीच्या २७ लाख क्विंटल कापसाची खरेदी केली. त्यातून ५ लाख ६० हजार ८०० गाठी बांधल्या. त्यापैकी विकल्या गेलेल्या पण शिल्लक असलेल्या ३००७ गाठी शिल्लक आहेत. खासगी व्यापाऱ्यांनीही मोठ्या प्रमाणात खरेदी केल्याचे हिराणी म्हणाले. गेल्या हंगामात सीसीआयने ८१.९५ लाख क्विंटल आणि खासगी व्यापाऱ्यांनी ८८.५० लाख क्विंटल कापूस खरेदी केला. २०१५-१६ च्या हंगामात खासगी व्यापाऱ्यांनी ४ नोव्हेंबरपर्यंत १०.८७ लाख क्विंटल कापसाची खरेदी केली. पत्रपरिषदेत महासंघाचे नागपूर संचालक वसंत कार्लेकर, ज्ञानेश्वर झळके, संदीप देशमुख, सल्लागार समिती सदस्य अशोक घोडमारे यांच्यासह सरव्यवस्थापक (प्रशासन) पुरुषोत्तम कोहडकर आणि महाव्यवस्थापक जयेश महाजन उपस्थित होते.
यंदा कापसाला भाववाढ नाही
By admin | Updated: November 6, 2015 04:15 IST