नागपूर : फेब्रुवारी महिन्याच्या १५ तारखेपासून वाढत चाललेला कोरोनाचा ग्राफ खाली येण्याचे नाव घेत नाही आहे. जवळपास दीड महिन्यांत चार ते पाचपट मृत्यूच्या संख्येत वाढ झाल्याने आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. शनिवारी ३७२० रुग्ण व ४७ मृत्यूची भर पडली. रुग्णांची एकूण संख्या २,३७,४९६ झाली असून, ५२६५ मृत्यूची नोंद झाली. शनिवारी रुग्णदर १.५६ टक्के, तर मृत्युदर २.२१टक्के होता.
नागपूर जिल्ह्यात १५,५९३ संशयित रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या. यात १२,३७६ आरटी-पीसीआर, तर ३२१७ रॅपिड अँटिजेन चाचण्यांचा समावेश होता. आरटी-पीसीआरमधून ३५३१, तर अँटिजेनमधून १८९ रुग्ण पॉझिटिव्ह आले. मेयोमध्ये सर्वाधिक २११२ चाचण्या झाल्या. यातून ५३७ रुग्ण पॉझिटिव्ह आले. मेडिकलमध्ये १६१५ चाचण्यांमधून ६२१, एम्समध्ये १८८ चाचण्यांमधून ५६, नीरीमध्ये २८२ चाचण्यांमधून १२१, नागपूर विद्यापीठाच्या प्रयोगशाळेच्या ७८८ चाचण्यांमधून २७०, तर खासगी लॅबच्या ७३९१ चाचण्यांमधून १९२६ रुग्ण पॉझिटिव्ह आले.
-शहरात २७८० तर, ग्रामीणमध्ये ८८० रुग्ण
नागपूर जिल्ह्यात आढळून आलल्या एकूण रुग्णंमध्ये शहरातील २७८०, तर ग्रामीणमधील ८८० रुग्णांचा समावेश आहे. मृतांमध्ये शहरातील २५, तर ग्रामीणमधील १७ मृत्यू आहेत. जिल्ह्याबाहेरील ५ रुग्ण व ५ मृत्यू नोंदविण्यात आले. सध्या ४०,८२० रुग्ण सक्रिय आहेत. यातील ३१,७३१ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये, तर ९,०८९ रुग्ण शासकीयसह खासगी रुग्णालय व कोविड केअर सेंटरमध्ये भरती आहेत.
-३६६० रुग्ण कोरोनामुक्त
दैनंदिन रुग्णसंख्येच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. शनिवारी ३६६० रुग्ण कोरोनामुक्त झाले. यात शहरातील २७८०, तर ग्रामीण भागातील ११२६ रुग्ण आहेत. आतापर्यंत १,९१,४११ रुग्णांनी कोरोनावर मात केली. रुग्ण बरे होण्याचा हा दर ८०.६० टक्के आहे.
कोरोनाची शनिवारची स्थिती
दैनिक चाचण्या : १५,५९३
ए. बाधित रुग्ण :२,३७,४९६
सक्रिय रुग्ण : ४०,८२०
बरे झालेले रुग्ण :१,९१,४११
ए. मृत्यू : ५२६५