नागपूर : कोरोनाच्या पदार्पणात जी धास्ती, सतर्कता जिल्ह्यातील गावकऱ्यांनी बाळगली होती, ती आता नाहीशीच झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे शहराबरोबरच आता जिल्ह्याचाही कोरोना ग्राफ वाढायला लागला आहे. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा अतिशय ढिसाळ असल्याची आरोप होत आहे. पॉझिटिव्ह निघण्याच्या भीतीने अजूनही ग्रामस्थ टेस्ट करायला भितात. जे रुग्ण गृहविलगीकरणात आहेत, ते बिनधास्त फिरत आहेत. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात चाचण्यांची संख्या कमी असली तरी रुग्ण पॉझिटिव्ह निघण्याची टक्केवारी वाढली आहे. गावेच्या गावे कोरोनाच्या विळख्यात आली आहेत.
जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग हा ग्रामीण आरोग्यावर लक्ष ठेवून आहे, असा दावा केला जात आहे. पण, मीटिंग आणि बैठकांमध्येच विभाग व्यस्त असल्याचे चित्र आहे. फिल्डवरील काम समाधानकारक नाही. टेस्टिंगचे अहवाल चार-चार दिवस रुग्णांना मिळत नाही. त्यामुळे रुग्ण गावभर फिरत असतो. अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्णांना औषधोपचार वेळेवर मिळत नाही. आरोग्य केंद्रामध्ये टेस्टींगवरही मर्यादा आहे. लसीकरण केंद्र आणि तपासणी एकाच ठिकाणी राबविली जात आहे. रुग्णांच्या घरात गृहविलगीकरणाची सोय नाही. ग्रामपंचायतीला प्रशासनाने विलगीकरणाची सोय उपलब्ध केली नाही. प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी ग्रामपंचायत प्रशासन दंडात्मक कारवाई करीत नाही. कोरोना रुग्णांवर नियंत्रण नाही. अपुऱ्या आरोग्य यंत्रणेमुळे मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत असल्याची ओरड होत आहे.
गावागावात मोठ्या प्रमाणात कोरोना पसरत असल्याच्या तक्रारी लोकप्रतिनिधींनी केल्या आहे. आरोग्य विभागाचे गावात दूर्लक्ष असल्याचीही ओरड त्यांनी केली आहे. अधिकारी बैठकांची बहाणा करून ऐकून घ्यायला तयार नसल्याच्या तक्रारी लोकप्रतिनिधींनी केल्या आहेत. जिल्ह्याचे आरोग्य वाऱ्यावर असल्याची ओरड होऊ लागली आहे. गेल्या दहा ते बारा दिवसांच्या आकडेवारी लक्षात घेता, येणाऱ्या दिवसांत शहरापेक्षा जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्हची संख्या जास्त वाढेल, असे बोलले जात आहे.
- जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती
दिनांक पॉझिटिव्ह मृत्यू
१६ मार्च ६६४ ४
१७ मार्च ६९९ ५
१८ मार्च ८८० ६
१९ मार्च ७०८ ९
२० मार्च ८५० ९
२१ मार्च ८८९ १०
२२ मार्च ९६७ १५
२३ मार्च ८१९ १०
२४ मार्च ७८२ ११
२५ मार्च ९७८ १०
२६ मार्च ११२६ १४
२७ मार्च १०८९ १७