लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - आयुष्याच्या सायंकाळी हतबल अन् एकाकी जीवन जगणाऱ्या वृद्ध दाम्पत्याला पोलिसांनी मदतीचा हात दिला अन् व्हॅक्सिनचा डोस मिळाल्याने उभारी आल्यागत ते वृद्ध दाम्पत्य खुलले. दिल बाग बाग झाले त्यांचे. शांतिनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आजची ही घटना त्या भागात चर्चा अन् प्रशंसेचा विषय ठरली.
शांतिनगरातील राज हाईटस् या इमारतीत १०६ क्रमांकाच्या सदनिकेत इकबाल हुसेन आरिफ (वय ७७) अन् त्यांची पत्नी जुलेखा (वय ७४) राहतात. वृद्धत्व अन् एकाकीपणाने हे दाम्पत्य पुरते हतबल झालेले. नीट घराबाहेर पडायची हिंमत नाही अन् सोयही नाही. त्यात बाहेर कोरोनाच्या रूपातील राक्षस आ वासून उभा आहे. त्याच्यापासून बचाव कसा करायचा, या चिंतेने या वृद्ध दाम्पत्याची घालमेल रोज वाढत होती. अखेर त्यांची ही हतबलता कुण्या एका सद्गृहस्थाने पोलीस नियंत्रण कक्षाला शनिवारी सकाळी ११ वाजता कळविली. नियंत्रण कक्षाने तो मेसेज शांतिनगर पोलिसांना कळविला. पोलीस उपनिरीक्षक पराग भिवापुरे आणि शिपाई सागर थाटे लगेच राज हाईटस्मध्ये पोहचले. त्यांनी आरिफ दाम्पत्याची सदनिका गाठली. काय मदत पाहिजे, अशी विचारणा केली. व्हॅक्सिन लेना है... असे दाम्पत्य म्हणाले. पोलिसांनी लगेच त्यांना एका वाहनातून महापालिकेच्या बस्तरवारी लालगंज भागातील रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांशी चर्चा करून आरिफ दाम्पत्याला व्हॅक्सिन देण्यात आली, नंतर त्यांना सुखरूप घरीही पोहचवून देण्यात आले. दरम्यान, या इमारतीत राहणाऱ्यांची कुजबूज आता चर्चेत रूपांतरित झाली होती. पोलिसांना धन्यवाद दिले जात होते. एरव्ही दाराआड राहणारे आरिफ दाम्पत्यही चांगलेच हुरुपले होते. ‘पुलिसवाले बेटोने अच्छी मदत की. दिल बाग बाग हो गया... भला हो उनका. सलामत रहे, बंदे’... असे म्हणत आरिफ दाम्पत्य अवघ्या पोलीस दलाला धन्यवाद देत होते. पोलिसांच्या या सामाजिक कार्याचे परिसरातही तोंडभरून काैतुक केले जात होते.
---