नागपूर : लॉकडाऊनच्या काळात ३० एप्रिलपर्यंत सलून दुकाने बंद ठेवण्याच्या शासनाच्या आदेशाला आता सलून व्यावसायिकांकडून विरोध व्यक्त होत आहे. या निर्णयाविरोधात सलून दुकानदार-कारागिरांच्या संघटना तसेच नाभिक समाज संघटना रस्त्यावर उतरण्याच्या पवित्र्यात आहेत.
महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या बैठकीमध्ये या निर्णयाला विरोध दर्शविण्याचे ठरले आहे. आंदोलनाचा भाग म्हणून गुरुवारी आपापल्या दुकानांसमोर लॉकडाऊनच्या आदेशाच्या प्रती जाळण्याचे आणि काळ्या फिती लावण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष गणपतराव चौधरी यांनी केले आहे.
नाभिक एकता मंचच्या पदाधिकाऱ्यांचीही बुधवारी दुपारी संस्थापक अध्यक्ष धनराज वालुकर यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यात शासनाला निवेदन देण्याचे ठरले. १० तारखेपर्यंत दुकाने उघडण्यास परवानगी मिळाली नाही तर स्वत:हून दुकाने उघडण्याचा निर्णय या बैठकीत झाला आहे.
राज़्याध्यक्ष रवी बेलपत्रे यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या निवडक पदाधिकाऱ्यांचीही बुधवारी दुपारी बैठक झाली. शासनाने दुकाने उघडण्यास परवानगी देण्यासाठी निवेदन देण्याचे ठरले. निर्णय न झाल्यास पुढील आठवड्यात परिवारासह दुकानांसमोर आंदोलन करण्याचे ठरल्याची माहिती जिल्हा सरचिटणीस प्रा. सतीश फोपसे यांनी दिली आहे.