नागपूर : आरोपीला जामिनावर सोडण्याच्या आदेशाचे उल्लंघन झाल्याचे प्रथमदर्शनी आढळून आल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी नागपूर मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक अनुपकुमार कुमरे यांच्याविरुद्ध स्वत:च अवमानना याचिका दाखल करून घेतली. तसेच, कुमरे यांना तुमच्यावर अवमानना कारवाई का करण्यात येऊ नये अशी कारणे दाखवा नोटीस बजावून २३ फेब्रुवारीपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.
प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व अमित बोरकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. अनुपकुमार कुमरे यांनी न्यायालयात तीन प्रतिज्ञापत्रे सादर करून स्वत:ची बाजू स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. तसेच, आदेशाचे जाणीवपूर्वक उल्लंघन केले नाही, असे नमूद करून न्यायालयाची माफीही मागितली. परंतु, त्यांच्या स्पष्टीकरणाने न्यायालयाचे समाधान झाले नाही. गेल्या २ फेब्रुवारी रोजी न्यायालयाने फसवणूक प्रकरणामध्ये रविशंकर लोंधेकर यांना जामिनावर सोडण्याचा आदेश दिला होता. परंतु, कुमरे यांनी सायंकाळी ५ वाजतानंतर आरोपीला सोडता येत नसल्याचे सांगून आदेशाचे पालन केले नाही. त्यामुळे त्यांना न्यायालयाचा दणका बसला.