धामणा : चालकाचे धाब्याजवळ कंटेनर व्यवस्थित पार्क करण्यासाठी मागे घेतला आणि चाक लगतच्या नालीत शिरले. त्यामुळे कंटेनर उलटला. यात केबिनमधील चालक व वाहकाला किरकाेळ दुखापत झाली. ही घटना हिंगणा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील पेठ शिवारात साेमवारी (दि. ७) रात्री ८.४५ वाजताच्या सुमारास घडली.
चालक एनएल-०१/एई-१४६३ क्रमांकाच्या कंटेनरमध्ये लाेखंड घेऊन नागपूरहून अमरावती मार्गे गुजरातला जात हाेता. जेवण करायचे असल्याने चालकाने कंटेनर पेठ शिवारातील धाब्याजवळ थांबविला. ताे व्यवस्थित पार्क करण्यासाठी त्याने हा कंटेनर थाेडा मागे घेतला. त्यातच मागचे चाक घसरून लगतच्या नालीत शिरले आणि कंटेनर उलटला. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी तयार करण्यात आलेली ती नाली अंदाजे तीन फूट खाेल असून, काठावर मुरुम टाकला आहे.
यात केबिनमधील कंटेनरचालक व वाहकाला किरकाेळ दुखापत झाली. नागरिकांनी त्यांना बाहेर काढले आणि त्यांच्यावर स्थानिक डाॅक्टरांकडून उपचार करवून घेतले. जखमींची नावे मात्र कळू शकली नाहीत. कंटेनर मंगळवारी (दि. ८) दुपारी १२.३० वाजताच्या दाेन क्रेनच्या मदतीने सरळ करण्यात आला. या घटनेची हिंगणा पाेलीस ठाण्यात नाेंद नाही, अशी माहिती पाेलीस सूत्रांनी दिली.