राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठनागपूर : संविधान हे माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क देणारे आणि त्याला समान पातळीवर दर्जा देणारे आहे. संविधानाने प्रत्येक नागरिक सारखाच मानला. त्यात गरिबी, श्रीमंतीचा भेद नाही आणि जातीपातीही नाहीत. यात केंद्रस्थानी आहे तो केवळ माणूसच. पण अद्यापही माणसाला त्याचे अधिकार मिळविण्यासाठी धडपडावे लागते. आपल्या देशात भेदभावाचे लोण अद्यापही कायम आहे. संविधानाचे संपूर्ण पालन झाले तर हा देश माणुसकीने बहरलेला असेल. पण संविधान योग्य पद्धतीने पाळल्या जात नसल्याने वेगवेगळ्या पातळ्यांवर माणसाचे जगणे वेदनादायी झाल्याची खंत व्यक्त करीत मानवी संवेदना व्यक्त करणाऱ्या संविधान काव्य जागरने आज रसिकांच्या ह्रदयाला हात घातला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे २६ नोव्हेंबर हा संविधान दिन केवळ दिन म्हणून न पाळता संविधान सप्ताह म्हणून पाळण्यात आला. या अंतर्गत विद्यापीठाच्या स्नातकोत्तर मराठी विभागाच्यावतीने संविधान काव्य जागर या काव्यसंध्येचे आयोजन दीक्षांत सभागृहात करण्यात आले. या काव्यसंध्येच्या अध्यक्षस्थानी भाऊ पंचभाई होते. याप्रसंगी कुलगुरु डॉ. विनायक देशपांडे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून मराठी विभागाचे डॉ. प्रमोद मुनघाटे यांनी कार्यक्रमामागील भूमिका विशद केली. काव्यसंमेलनाचा प्रारंभ कवयित्री मनिषा साधू यांनी एका गझलने केला. समाजातील विषमतेचे दु:ख त्यांनी त्यांच्या कवितेतून व्यक्त करताना संविधान म्हणजे आई या भूमिकेतून त्यांनी काही ओळींनी भाष्य केले. यानंतर तीर्थराज कापगते यांनी ‘नवी गीता’आणि ‘युद्ध’ या कविता सादर केल्या. पण संविधानाच्या पालनातून निकोप समाजाचा आशावादही त्यांनी मांडला. ह्रदय चक्रधर यांनी संविधानाचे महत्त्व कवितेतून व्यक्त केले. सुनिता झाडे निसर्ग आणि निसर्गनियमांच्या माध्यमातून मानवी संवेदनांचा पट उलगडला. उल्हास मनोहर यांनी समाजाच्या दुटप्पीपणाची खंत व्यक्त करताना काही प्रश्न निर्माण केले. सुमती वानखेडे आजच्या एकूणच स्थितीवर मार्मिक भाष्य केले. वसंत वाहोकर व्यवस्थेच्या इतक्या भ्रष्टतेत गुलाब कसा फुलेल, असा प्रश्न करताना अशा स्थितीत कविताच येत नाही, असे मत मांडले. भाग्यश्री पेटकर यांनी स्त्रीच्या हळुवार भावनांचा पट व्यक्त केला. इ. मो. नारनवरे यांनी ‘काल आम्ही साहिला तो केवढा अंधार होता, केवढा रस्त्यावरी उन्माद अन अंगार होता’ अशी ओळींनी कविता गेय स्वरूपात सादर केली.या कार्यक्रमाचे संचालन मनिषा रिठे यांनी केले. संचालनात काही भावस्पर्शी ओळींनी त्यांनी कार्यक्रमाचा समा बांधला. याप्रसंगी भाऊ पंचभाई यांनी कवितांच्या सादरीकरणातून संविधान मानवी जगण्याला किती पूरक आहे, त्याची मांडणी केली. (प्रतिनिधी)
मानवी संवेदना व्यक्त करणारा ‘संविधान काव्य जागर’
By admin | Updated: December 5, 2014 00:41 IST