महापालिकेत स्वबळाचा नारा : बुथ स्तरापर्यंतची तयारी पूर्ण आनंद डेकाटे ल्ल नागपूर बहुजन समाज पार्टी (बसपा) आगामी महानगरपालिकेची निवडणूकसुद्धा कुणाशीही युती किंवा आघाडी न करता पूर्ण ताकदीनिशी स्वबळावर लढणार आहे. निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाच्या संघटन बांधणीचे काम पूर्ण झाले आहे. सेक्टर ते बुथ स्तरापर्यंतच्या कॅडरबेस कार्यकर्त्यांची फळी तयार आहे. याशिवाय भाईचारा कमिटीसुद्धा सोबतीला आहे. नागपूर महापालिकेच्या निवडणुकीचा विचार केला असता बसपाला वॉर्डपेक्षा प्रभागपद्धतीत अधिक लाभ होत असल्याचा इतिहास आहे. मागची २०१२ ची महापालिकेची निवडणूक ही दोन सदस्यीय प्रभाग पद्धतीने लढविली गेली. यात बसपाने स्वबळावर ९८ जागा लढविल्या होत्या. यात बसपाचे एकूण १२ नगरसेवक निवडून आले. तर १२ उमेदवार हे दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते. बसपाचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय आहे. त्या निवडणुकीमध्ये बसपाने अनुसूचित जातीचे ५०, अनुसूचित जमातीचे ६, ओबीसीचे ३१, अल्पसंख्याक ८ आणि सवर्ण समाजाच्या दोघांना उमेदवारी दिली होती. यापूर्वी २००२ मध्ये तीन सदस्यीय प्रभाग पद्धती होती. त्यावेळीसुद्धा बसपाने चांगली कामगिरी केली. त्या निवडणुकीमध्ये बसपाचे पहिल्यांदाच नऊ नगरसेवक महापालिकेवर निवडून आले होते. त्यानंतर २००७ ची मनपा निवडणूक ही वॉर्ड पद्धतीने लढविल्या गेली. तेव्हा १३६ वॉर्ड होते. त्या निवडणुकीमध्ये बसपाने स्वबळावर ९१ उमेदवार उभे केले होते. त्यात केवळ चार नगरसेवक निवडून आले होते. एकूण उमेदवारांना तेव्हा ५१,०६२ मते पडली होती. २०१७ मध्ये होणारी निवडणूक ही चार सदस्यीय प्रभाग पद्धती आहे. प्रभाग पद्धतीमध्ये बसपाला लाभ होत असल्याचा पूर्व अनुभव लक्षात घेता पक्ष जोमाने कामाला भिडला आहे. पक्षबांधणीच्या दृष्टीने प्रदेशाध्यक्ष विलास गरुड हे स्वत: गेल्या वर्षभरापासून दर महिन्याला नागपूर व विदर्भाचा दौरा करीत आहेत. त्याचे परिणामही दिसून आले आहेत. नागपूर शहरात प्रत्येक सेक्टर आणि बुथ स्तराची बांधणी झाली आहे. एका सेक्टरमध्ये (वॉर्ड) दहा बुथ तयार करण्यात आले आहेत. एका बुथवर अध्यक्ष व महासचिवासह सहा सदस्यांची समिती कार्यरत झाली आहे. असे एका विधानसभा मतदारसंघात ३०० बुथ आहेत. यासोबत प्रत्येक बुथवर भाईचारा कमिटी कार्यरत आहे. बुथची जबाबदारी पाहणाऱ्यांवर पक्षाच्या पारंपारिक मतदारांची जबाबदारी निश्चित करण्यात आली असून भाईचारा कमिटीच्या प्रत्येक सदस्याला त्याच्या-त्याच्या समाजातील मतदाराची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. याप्रमाणे प्रत्येक पदाधिकाऱ्याला मतदाराची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. या कॅडरबेस संघटनेतील कार्यकर्ता पदाधिकाऱ्याच्या भरवशावर बसपा पूर्ण ताकदीने या निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे. बसपाशिवाय महापौर होणार नाही बसपा नेहमीप्रमाणेच स्वबळावर निवडणूक लढणार आहे. आम्ही सर्व जागा लढवणार आहोत. जास्तीत जास्त जागा जिंकून आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. सेक्टर आणि बुथ स्तरापर्यंतची तयारी पूर्ण झालेली आहे. यावेळी आमचे एकच टार्गेट आहे, ते म्हणजे बसपाशिवाय महापौर होणार नाही. नागपूरचा महापौर कोण होईल, हे यावेळी बसपाच ठरवेल. -जितेंद्र म्हैसकर, प्रदेश महासचिव, बसपा.
बसपाचे एकला चलो
By admin | Updated: November 8, 2016 02:51 IST